Dilip Walse Patil: राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवणार का?; दिलीप वळसे पाटील यांचं एका वाक्यात काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्याची मागणी केली. त्याला भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी भोंगे उतरवण्याची मागणी केली. त्याला भाजपने (bjp) पाठिंबा दिला आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने करुन जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना तयार केली जात आहे. मात्र महाराष्ट्रात तसं काही होईल असे वाटत नाही. पोलीस लक्ष ठेवून आहेत, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. भाजपच्या या अजेंडयाची सुरूवात कर्नाटक राज्यातून झाली आहे व अन्य राज्यांमध्येही हा अजेंडा भाजपने सुरू केला आहे, असंही ते म्हणाले. आज राज्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसेपाटील (dilip walse patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे. राज्यातील पोलीस यंत्रणा आपापल्यापरीने लक्ष ठेवून आहेत. भविष्यात कायदा व सुव्यवस्था असाच ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन दिलीप वळसेपाटील यांनी केले.
समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय
अलीकडच्या काळामध्ये भडकाऊ भाषणे करून समाजासमाजामध्ये तेढ व संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. ही बाब राज्याच्या व देशाच्या एकतेच्या दृष्टीकोनातून बरोबर नाहीय यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. असेही त्यांनी सांगितलं. नाशिकच्या पोलिस आयुक्त पत्र प्रकरणावर बोलताना सदर गोष्ट त्यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली पाहिजे असे सांगितले. विरोधकांच्या मंदिरांवरून स्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याच्या प्रकरणावरून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना पोलिस प्रशासन घेईल, असे त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारला धोका नाही
संजय राऊत यांना कोणतीही नोटीस न देता किंवा चौकशी न करता कारवाई ईडी करत असेल तर केंद्रसरकारचा कारभार कशाप्रकारे सुरू आहे हे लक्षात येत आहे. मात्र यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी (SIT) नेमून चौकशी करण्यात येईल, असे सांगतानाच अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल. त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
संबंधित बातम्या:
Nitin Raut: ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाचे केंद्र सरकारचे प्रयत्न हाणून पाडू; नितीन राऊत यांचा इशारा
Sanjay Raut ED: संजय राऊतांची संपत्ती जप्त का झाली? 9 प्रश्न आणि त्याची 9 उत्तरं सोप्या शब्दांत