विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी थेट लॉरेन्स बिश्नोईला पत्र, या पक्षाकडून तिकीट?
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सध्या देशात लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आहे. सलमान खानला त्याच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. असं असताना एका पक्षाने थेट लॉरेन्स बिश्नोईला महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनाने लॉरेन्स बिश्नोईला पत्र लिहिले आहे. गुजरातमधील साबरमती तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याला पोस्टाने पत्र पाठवण्यात आले होते. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष पं. सुनील शुक्ला यांनी साबरमती मध्यवर्ती कारागृहात पत्राद्वारे महाराष्ट्र विधानसभेचे तिकीट देण्याची घोषणा केली आहे. पं सुनील शुक्ला यांच्या राजकीय पक्ष “उत्तर भारतीय विकास सेनेने लॉरेन्स बिश्नोई याला तिकीट देण्याची घोषणा केली आहे.
लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई याला थेट पत्र पाठवत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये लढवण्याची विनंती या पक्षाने केली आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अशा प्रकारे पत्र लिहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सध्या देशात लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचे शुटर वेगवेगळ्या प्रकरणात तुरुंगात आहेत. नुकताच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणानंतर ही टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आतापर्यंत ९ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. बाबा सिद्दिकी यांना खरंच लॉरेन्स बिश्नोई गँगने मारले आहे का याचा तपास सुरु आहे. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी बाा सिद्दिकी यांची हत्या सलमान खानमुळे नाही तर जागेच्या वादातून झाल्याचं म्हटलं आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँग सध्या अनेक राज्यांमध्ये सक्रिय असल्याचं समोर आलं आहे. फक्त हरियानाच नाही तर पंजाब, दिल्ली, राज्यस्थान या राज्यांमध्ये देखील लॉरेन्स बिश्नोई नेटवर्क काम करत असल्याचं बोललं जात आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीवर वेगवेगळ्या राज्यात गुन्हे दाखल आहेत.
लॉरेन्स बिश्नोई विरुद्ध 12 वर्षात 36 गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आलेत. पंजाब, चंदीगड, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली येथे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 36 पैकी 21 प्रकरणांमध्ये अद्याप सुनावणी सुरू आहे, तर 9 प्रकरणांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.