ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, सांगलीत बैठकीत तोडगा निघाला
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. सांगली जिल्ह्यात ऊसाच्या दराच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. प्रशासन, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कारखानदार यांच्यात आज पार पडलेल्या बैठकीत या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला आहे.

शंकर देवकुळे, Tv9 मराठी, सांगली | 27 डिसेंबर 2023 : सांगली जिल्ह्यातील ऊस दरावरुन सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. ऊस दराबाबतच्या प्रश्नावर आज तोडगा निघाला आहे. प्रशासन, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्ये यांच्यातील आजच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. साखर कारखान्यांनी विना कपात 3175 रुपये दर देण्याचे निश्चित केलं आहे. त्यामुळे ऊस आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या मुद्द्यावरुन जोरदार आंदोलन करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रशासन आणि साखर कारखानदार यांच्याशी बैठका होत होत्या. पण या बैठका निष्फळ होताना दिसत होत्या. अखेर आजच्या बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे.
कोल्हापूर फॉर्मुल्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही ऊसाला दर मिळावा या मागणीसाठी गेल्या अनेक महिने आंदोलन सुरू होते. या आंदोलनात स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सहभागी झाले होते. त्यांच्या नेतृत्वात काटा बंद आंदोलन देखील करण्यात आलं होतं. यानंतर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी दर जाहीर केला. मात्र उर्वरित साखर कारखान्यांना दर मान्य नसल्याने हे आंदोलन चालूच राहिले होते.
दुष्काळी पट्ट्यातील साखर कारखाने किती दर देणार?
यानंतर प्रशासनाने साखर कारखानदार शेतकरी संघटना यांच्यात बैठक बोलावली. दोन बैठकीनंतर आज हा तोडगा निघाला आहे. कारखानदारांनी 3175 रुपये दर देण्याचं जाहीर केले आहे. तर दुष्काळी पट्ट्यातील साखर कारखान्याने 3100 दर देण्याचं याआधीच जाहीर केले आहे. त्यामुळे या आंदोलनाला यश मिळालं आहे.
साडे बारा टक्के रिकव्हरीच्या वर आहे, त्या साखर कारखान्यांना विना कपात 3175 रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हे यश आले. यापुढे ऊसाची काठामारी, इथेनॉलची लढाई सुरूच राहणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.