माझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे, परळीत निवडून द्या : धनंजय मुंडे
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी त्यांची बहीण आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही जोरदार टीका केली. गल्ली ते दिल्ली सत्ता असूनही काही करता आलं नाही, असं ते (Dhananjay Munde) म्हणाले.
बीड : आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघ किती प्रतिष्ठेचा ठरणार आहे ते राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या भाषणाने दाखवून दिलंय. ही निवडणूक माझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे, मी गेल्या 24 वर्षात केलेल्या सेवेचं फळ मला द्या, असं म्हणत त्यांनी (Dhananjay Munde) विजयी करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी त्यांची बहीण आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही जोरदार टीका केली. गल्ली ते दिल्ली सत्ता असूनही काही करता आलं नाही, असं ते (Dhananjay Munde) म्हणाले.
“परळीत एवढे प्रश्न असताना महाराष्ट्रातील प्रश्नावर काय बोलावं असा प्रश्न पडतो. परळीने यापूर्वीही 1995 ते 1999 सत्ता पाहिली, सध्याही सत्ता आहे. पण या दहा वर्षांच्या सत्तेत परळी मतदारसंघाला काय मिळालं हा मोठा प्रश्न आहे. आपल्या इतिहासात कधी नागापूरचं धरण कोरडं पडलं नाही, पण ते यावर्षी कोरडं पडलं. मुंडे साहेबांचं स्वप्न होतं की माजलगावच्या धरणातून जायकवाडीचं पाणी वाण धरणातून आणावं. पण माजलगावचं पाणी वाण धरणात येऊ शकलं नाही, धरणाची उंची वाढली नाही. हे आपलं दुर्दैवं आहे,” असं म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजांवर सडकून टीका केली.
“या भागाच्या लोकप्रतिनिधी, पालकमंत्री ग्रामविकास मंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री, ज्यांना दोन वेळा निवडून दिलं, एवढं महत्त्वाचं पद असतानाही, राज्यात, दिल्लीत सत्ता असतानाही आमच्या ताई साहेबांना नागापूरच्या वाण धरणात पाणी का आणता आलं नाही याचं उत्तर कुणी तरी विचारायला हवं. मुंडे साहेबांचं ते स्वप्न होतं की परळीत पंचतारांकित एमआयडीसी असावी, उपमुख्यमंत्री झाल्यावर तो प्रयत्नही झाला, तेव्हा एमआयडीसी झाली नाही. कारण, तेव्हा शेतकऱ्यांनी विरोध केला, पण या सत्ताकाळात एमआयडीसी का आली नाही,” असा सवाल त्यांनी पंकजा मुंडे यांना केला.
“फेब्रुवारी 2018 पासून राज्याच्या उद्योगमंत्र्यांना पत्र देतोय की परळीच्या एमआयडीसीसाठी बैठक लावा. नागपूरच्या अधिवेशनात पत्र दिल्यानंतर उद्योगमंत्र्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन बैठक लावली. शेती घेण्याची गरज नाही असं त्यांना पटवून दिलं. शिरसाळ्याला अजूनही जमीन गायराण आहे, एमआयडीसी होऊ शकते हे पटवून सांगितलं आणि सकारात्मक निर्णय झाला. अधिकाऱ्यांनी सर्वे केला. मग आमच्या ताई साहेबांना कळलं की आपल्याकडे एमआयडीसीही होऊ शकते. तोपर्यंत कळलं नाही. पाच वर्षात का कळलं नाही,” असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.
“2009 ला मुंडे साहेबांना वाटलं धनंजयऐवजी ताईला उमेदवारी द्यावी, त्यावेळी मन मोठं करुन माघार घेतली. आम्ही मोठं मन करुन मतदारसंघ दिला, आमदार झालात, तुमच्याकडून लोकांच्या जीवनात क्रांती येईल असं वाटलं, पण काहीही झालं नाही,” असं धनंजय मुंडे म्हणाले.
“विचार वेगळे झाले. त्यानंतर मी कधी विकासाच्या पलीकडचं राजकारण केलंय का? विरोधाला विरोध करायचा म्हणून मी कधी राजकारण केलं नाही. कोणतीही निवडणूक आली की भाऊ विरोध करतो, एवढंच सांगितलं जातं. कधी तरी विचार करा, बारामतीसारखा आपला विकास व्हावा असं वाटत नाही का, तेच स्वप्न मी पाहिलं असेल आणि पूर्ण करण्यासाठी तुमचा आशीर्वाद हाव असेल, तर कुणाला विरोध करण्यासाठी करतोय का? स्वर्गीय अण्णांनी हयात घातली तुमच्या सेवेसाठी.. कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. लहान भाऊ मोठा झाला पाहिजे हे स्वप्न पाहिलं आणि जी इच्छा असेल ती पूर्ण केली,” असं धनंजय मुंडे म्हणाले.
“पोरगं कर्तृत्ववान, मेहनती आहे, पण फक्त मुडे साहेबांच्या पोटी जन्म झाला नाही एवढीच माझी चूक आहे का? परळीची निवडणूक लक्षवेधी होणार आहे. प्रत्येकाच्या उंबऱ्यावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यातही फिरावं लागेल, या मतदारसंघात तुमच्या या लेकराच्या विजयाची जबाबदारी हातात घेणार आहात का हा प्रश्न विचारायचाय,” असं म्हणत त्यांनी उमेदवारांना साद घातली.
“मी कुठे कमी पडत नसेल तर माझ्यात काय कमी आहे याचा विचार करा, हात जोडून कळकळीची विनंती करतोय, माझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे.. 24 वर्ष सेवा केली त्याचा आशीर्वाद देण्याची ही निवडणूक आहे, निवडणकीत पुन्हा येतील आणि भावनिक आवाहन करतील. आतापासूनच चाललंय, धनंजयला मत दिलं तरी वर कुठे सत्ता येते, पण अजित दादांच्या नेतृत्त्वात आम्ही राज्यातही सत्ता आणू,” असं म्हणत परळीत निवडून देण्याचं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं.