Dombivli News : 50 ते 60 विद्यार्थ्यांना दिला बेदम चोप, शिक्षिकेच्या कारनाम्यामुळे पालक संतापले
एका शिक्षिकेने 50 ते 60 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुलांच्या संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत जाब विचारला. शिक्षकाची कुठलीही नोंद नसल्याने मनसे व शिवसेना कार्यकर्त्यांनीही आंदोलन करत गोंधळ घातला .
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 13 ऑक्टोबर 2023 : शाळा हे विद्येचे मंदीर असते. अभ्यासासोबतच आयुष्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. कधीकधी ते मुलांना शिक्षाही करतात. मात्र ती भल्यासाठी असते. पण काही शिक्षक एका मर्यादेबाहेर जाऊन शिक्षा करतात, तेव्हा त्याचा त्रास लहान मुलांना सहन करावा लागतो.
अशीच एक शिक्षेची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली असून त्यावरून गदारोळ माजला आहे. डोंबिवलीतील जोंधळे विद्यामंदिर शाळेत एका शिक्षिकेने 50 ते 60 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुलांच्या संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत जाब विचारण्यास सुरूवात केली. त्यांनी या प्रकाराची माहिती मनसे विद्यार्थी सेनेलाही दिली. त्यानंतर मनविसे च्या कार्यकर्त्यांनीही आशळेत येऊन घडालेल्या प्रकाराबद्दल मुख्यध्यापकांना जाब विचारला. तसेच संबंधित शिक्षिकेवर त्वरीत कारवाई करण्याचीही मागणी केली. पोलीस मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती वरती नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नेमकं काय झालं ?
डोंबिवलीतील एस एच जोंधळे विद्या मंदिर इंग्रजी माध्यम ह्या शाळेत नीलम भारमल या गणित विषय शिकवत होत्या. मात्र गणित येत नाही म्हणून त्यांनी पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. त्यासाठी त्यांनी लोखंडी रॉडचा वापर केल्याने अनेक मुलं गंभीर जखमी झाली. यामुळे संतप्त पालकांनी त्या शिक्षिकेवर कारवाई करण्यासाठी शाळेत मोठा गोंधळ घातला. यावेळेस शिवसेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देखील कारवाईसाठी शाळेच्या मुख्याध्यापिकाच्या कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केले. तसेच कारवाईची मागणीही केली. पालकाचा संताप पाहताच मुख्याध्यापकाने संबंधित शिक्षकावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. मात्र शाळा प्रशासन हे मनाला येईल त्याप्रमाणे वागत आहे, कोणालाही शिक्षक म्हणून रुजू करतात. या सर्व प्रकाराने विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि भविष्य दोन्ही धोक्यात येत आहे. शाळेत अक्षरश: खेळ मांडला आहे, असा आरोप देखील या वेळेस पालकांनी केला.
काय म्हणाले मुख्याध्यापक ?
हा प्रकार शाळेत पहिल्यांदाच घडला आहे. त्या शिक्षिकेची नवीनच नियुक्ती करण्यात आली होती. तिचं शिकवणं चांगल्या असल्यामुळे तिला ही नोकरी देण्यात आली होती. मात्र तिने दिलेली ही शिक्षा (मारहाणीचा प्रकार) अजिबात योग्य नसून अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्या संबंधित शिक्षकेवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याध्यापकांनी दिले. तसेच भविष्यात असा प्रकार कधीच घडणार नाहीत, याची काळजी घेऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.