पुन्हा वांदेः ‘डीपीसी’वरून आमदार कांदेंचा पंगा सुरूच; निधी वर्ग करू नका, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत थेट आत्मदहनाचा इशारा
पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात पुन्हा एकदा वांदे होण्याची शक्यताय. त्याला कारणही अर्थातच बहुचर्चित डीपीसी म्हणजेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीचंय. कांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निधी वर्ग करू नका, असं पत्र लिहिलंय.
नाशिकः पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात पुन्हा एकदा वांदे होण्याची शक्यताय. त्याला कारणही अर्थातच बहुचर्चित डीपीसी म्हणजेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीचंय. कांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निधी वर्ग करू नका, असं पत्र लिहिलंय.
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात आडवा विस्तू जात नाहीय. त्याचं कारण अर्थातच नांदगाव मतदारसंघ. गेल्याच आठवड्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी नांदगावमध्ये जात आमदार कांदेंना बळ दिलं. इतकंच नाही, तर नांदगावचा नाद करायचा नाही, असा इशारा थेट पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिला. त्यामुळंच आता पुन्हा एकदा आमदार कांदे आक्रमक झालेत. त्यांनी पुन्हा भुजबळांशी पंगा घेण्याचं ठरवलेलं दिसतंय. कारण त्यांनी नुकतंच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना एक पत्र दिलंय. त्यात डीपीसी निधीचं प्रकरण वादग्रस्त आहे. त्यामुळं हा निधी वर्ग करू नका. अन्यथा पोलिसांत तक्रार करत आत्मदहन करू, असा इशारा दिलाय.
200 कोटींचा निधी
नांदगाव मतदार संघातील 200 कोटींच्या निधीचं हे प्रकरणय. यासाठी येत्या 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्याची शक्यताय. त्यात या निधीबाबत काही निर्णय होऊ शकतो. त्यामुळं त्यापूर्वीच आमदार सुहास कांदे आक्रमक झालेत. या वादग्रस्त निधीप्रकरणी आपण न्यायालयात गेलो आहोत. त्यामुळं त्यावर कुठलाही निर्णय घेऊ नये, असा इशाराच त्यांनी दिलाय.
निधीवरून याचिका
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप करत पालकमंत्री छगन भुजबळांविरोधात याचिका दाखल केलीय. विशेष म्हणजे ही याचिका मागे घ्यावी म्हणून आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे कांदे यांनी म्हटलं होतं. मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले होते.
पोलीस आयुक्तांकडून चौकशी
आमदार सुहास कांदे यांचे भाऊ टोलनाका चालवतात. या टोलनाक्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यासाठी मी सुहास कांदे यांना फोन केला. त्यांना फोनवर मी कुठलिही धमकी दिली नाही. छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या, असे म्हणालो नाही, असा दावा निकाळजे यांनी केला होता. याप्रकरणी दोघांच्या परस्परविरोधी तक्रारीवरून पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरू केली. त्यावरचा निर्णय प्रलंबितय.
इतर बातम्याः
कंटेरनच्या धडकेत बसचालक दीडशे मीटर फरफटला; लासगाव स्टँडसमोरील भयावह घटनेत जागीच मृत्यू, दोन दुकानांचेही नुकसानhttps://t.co/QtlQLkbfx4#Nashikaccident|#Lasalgaonaccident|#containerbushit|#busdriverkilled
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2021