Ramdas Kadam: पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा शिवसेनाप्रमुखांचे विचार आठवले नाहीत का?, रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे असे सांगत किती दिवस महाराष्ट्राला ब्लॅकमेल करणार आहात, असा सवालच थेट रामदास कदमांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांची भावनात्मक डायलॉ़गबाजी थांबवावी, असेही रामदास कदम म्हणाले आहेत.
रत्नागिरी- एकनाथ शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम (Ramdas Kadam)हे आता अक्रमक झालेले दिसत आहेत. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस राज्याला ब्लॅकमेल (blackmail)करणार आहात, असा थेट सावलच रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे. पहिल्यांदाच शिंदे गटातील एका मोठ्या नेत्याने थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्याचे दिसते आहे. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)जेही मिळाले ते शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मिळाले, आदित्य ठाकरेंना जे पक्षात, सत्तेत जे स्थान मिळाले ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून मिळाले असल्याचे सांगत पक्ष संघटना कुणी वाढवली असा सवाल कदम यांनी केला आहे. पक्ष संघटना आपल्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी वाढवली असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आगामी महाराष्ट्र दोऱ्यावरही त्यांनी टीका केली आहे. त्यांच्या दौऱ्यानंतर आपणही राज्याचा दौरा करणार असल्याचे सांगत, खरे सत्य जनतेला कळेल असेही रामदास कदम म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरीचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावरही टीका केली आहे.
किती दिवस ब्लॅकमेल करणार – कदम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे असे सांगत किती दिवस महाराष्ट्राला ब्लॅकमेल करणार आहात, असा सवालच थेट रामदास कदमांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांची भावनात्मक डायलॉ़गबाजी थांबवावी, असेही रामदास कदम म्हणाले आहेत. सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का, असा सवालही रामदास कदम यांनी विचारला आहे.
आता दौरे कशासाठी, तेव्हा का केले नाहीत?- कदम
राज्यातील सत्ता गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत. आता जाणीव झाल्यानंतर सगळ्या शिवसेना नेत्यांच्या गाठीभेठी सुरु झाल्या आहेत. मग सत्तेत असताना गेली अडीच वर्षात काय झाले होते, असा प्रश्नही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आपणही राज्याचा दौरा करणार असल्याचे रामदास कदम यांनी जाहीर केले आहे. नेमके काय घडले आहे, ही व्सतुस्थिती राज्यातील जनतेला सांगणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे.