ठाकरे VS शिंदे, महासंग्राम, धनुष्यबाणाची महासुनावणी, केंद्रीय निवडणूक आयोगात काय-काय घडलं?
केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) आज शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण चिन्हं कुणाचं? या मुद्द्यावरुन महत्त्वाची सुनावणी पार पडली.
संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) आज शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण चिन्हं कुणाचं? या मुद्द्यावरुन महत्त्वाची सुनावणी पार पडली. ही सुनावणी जवळपास दीड तास चालली. या दीड तासात दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. निवडणूक आयोगातील आजची सुनावणी ही फार महत्त्वाची मानली जात होती. कारण केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत अंतिम निकाल देईल, असा अंदाज बांधला जात होता. पण ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी आपल्याला आणखी अडीच तास युक्तिवादासाठी देण्यात यावा, अशी विनंती केली. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ही सुनावणी तीन दिवस पुढे ढकलली. आता केंद्रीय निवडणूक आयोगात येत्या शुक्रवारी 20 जानेवारीला या प्रकरणावर सुनावणी होईल. या सुनावणीवेळी ठाकरे गटाच्या वकिलांकडून नेमकी काय भूमिका मांडण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
केंद्रीय निवडणूक आयोगातील आजच्या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे तब्बल 20 वकिलांपेक्षा जास्त वकील हजर होते. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे सुनावणीसाठी हजर होते. तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि अनिल परब हे दोन दिग्गज नेते सुनावणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगात हजर होते.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला आपला युक्तिवाद सुरु केला. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे आधी कागदपत्रे सादर केली. त्यानंतर आपल्या युक्तिवादाला सुरुवात केली.
शिंदे गट हे वास्तव नाही, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
शिवसेनेतील फूट कपोकल्पित आहे. शिंदे गट हे वास्तव नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे.शिवसेनेत फूट झालेली नाही. जे आमदार बाहेर पडले आहेत ते त्यांच्या इच्छेने बाहेर पडले आहेत. पक्षातून बाहेर पडले ते वेगळ्या गटाचे आहेत. शिंदे गट ही शिवसेना नाही, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.
“शिवसेना फुटीचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही. ही फूट ग्राह्य धरु नये”, असं कपिल सिब्बल यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी पक्षाची घटना वाचायला सुरुवात केली.
कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतिक्षा करा, कपिल सिब्बल यांची विनंती
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका. कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतिक्षा करा. कोर्टाचा निर्णय आधी येऊ द्या, असं कपिल सिब्बल यावेळी म्हणाले.
शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गटाची अनेक प्रतिज्ञापत्र बोगस आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.
काही लोकांना घेऊन पक्षातून बाहेर पडणं बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्यात. सर्व कागदपत्रांची छाननी करावी, अशी विनंती कपिल सिब्बल यांनी केली.
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरु
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद सुरु केला. “पक्षातून एखादा मोठा गट लोकप्रतिनिधींसह बाहेर पडला तर त्यात बेकायदेशीर काय?”, असा सवाल महेश जेठमालांनी यांनी केला.
‘आमच्याकडे संख्याबळ जास्त’, जेठमलानी यांचा युक्तिवाद
“आमच्याकडे 40 आमदार आणि 12 खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार-खासदारांचं बहुमत जास्त आहे. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ जास्त असल्याने चिन्हाचा निर्णय घ्यावा”, अशी मागणी जेठमलानी यांनी केली.
‘मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी बाहेर पडत आहेत, यामध्ये तथ्य’
“आम्ही कागदपत्रे सादर केले आहेत. त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. ठाकरे गटाचे पदाधिकारी होते त्याचपद्धतीने शिंदे गटाचे पदाधिकारी नेमले गेले होते. त्यामध्ये कोणतीही चूक नाही. मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी बाहेर पडत आहेत, यामध्ये तथ्य आहे”, असा युक्तीवाद जेठमलानी यांनी केला.
यावेळी शिंदे गटाच्या वकिलांकडून आधीच्या निकालांचा दाखला दिला गेला. आदिक अली प्रकरणाचा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून दाखल देण्यात आला.
‘चिन्हासाठी बहुमत आवश्यक’
चिन्हासाठी बहुमत आवश्यक आहे आणि शिंदे गटाकडे बहुमत आहे, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.
शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी नाहीत. ठाकरे गटाचा युक्तीवाद चुकीचा आहे, असं उत्तर जेठमलानी यांनी ठाकरे गटाच्या वकिलांना दिलं.
कपिल सिब्बल यांचा पुन्हा युक्तिवाद, शिंदे गटाला विचारले महत्त्वाचे प्रश्न
महेश जेठमलानी यांच्यानंतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा युक्तिवाद सुरु केला.
पक्षाच्या घटनेला आवाहन देता येत नाही. निवडून आलेले आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि पक्ष वेगवेगळा आहे. पक्षात होता तेव्हा पक्षाच्या घटनेवर आक्षेप का घेतला नाही? पक्षाचा लाभ घेतला आणि परत लोकशाही नाही म्हणता, अशा शब्दांत कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना ठाकरे गटाला सुनावलं.
कागदपत्रे खरी ठरी असतील तर ओळख परेड करा. तातडीने निर्णय देऊ नका, कोर्टाच्या निकालाची प्रतिक्षा करा, अशी विनंती पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी केली.
आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नाही. म्हणजे आमची पक्षाची घटना कायदेशीर आहे. आमदार आणि खासदार हे पक्षाच्या नुसार निवडून येतात. पक्षाच्या धोरणांना मानून मतदार मतदान करतात. पक्षाची घटना ही योग्यच आहे. तिला आव्हान देता येऊ शकत नाही. आतापर्यंत उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत होते, मग आताच आक्षेप का? असा सवाल वकील कपिल सिब्बल यांनी केला.
पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मुदतवाढ द्या, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली. यावेळी पक्षांतर्गत निवडणूक कशी झाली त्याचे कागदपत्रे सिब्बल यांच्याकडून सादर करण्यात आले.