आर. आर. पाटील यांचे बंधू राष्ट्रपती पोलिस पदकाचे मानकरी
पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजाराम पाटील यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. ते माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे भाऊ आहेत.
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्राचे माजी – दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील (R R Patil ) यांच्या भावाचा राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मान करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त राजाराम पाटील यांना उत्कृष्ट सेवेसाठी दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शौर्य पदक, पोलिस शौर्य पदक, उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील पाच जणांना राष्ट्रपती पोलिस पदक देण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दोन सहाय्यक पोलिस आयुक्त आणि एका पोलिस निरीक्षकाला राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे.
आर. आर. पाटील यांचे बंधू असलेले राजाराम रामराव पाटील गेल्या काही महिन्यांपासून सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहेत. त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी राष्ट्रपती पोलिस पदक बहाल करण्यात आले.
सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव आणि पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनाही ‘राष्ट्रपती पोलिस पदका’ने सन्मानित करण्यात येणार आहे. रामचंद्र जाधव यांची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख आहे, तर आधी चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहिलेले बालाजी सोनटक्के आता गुन्हे शाखेचे काम पाहतात.