स्वप्न सोडाच मूलभूत गरजाही वाहून गेल्या, मायबाप सरकार मदत कधी करणार ?
सोयाबीन या पिकाच्या संदर्भात हेक्टरी 80 ते 85 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
Agriculture News : गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) बळीराजा मेटाकुटीला आला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी (Nashik Farmer) हा प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखला जातो, मात्र प्रयोगशील शेतकऱ्याबरोबरच हंगामी पिके घेणारा शेतकरी वर्ग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मागील महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस आल्याने सोयाबीन पिकात पाणी साचले होते. त्यामध्ये जवळपास 40 टक्के पिकाचे नुकसान झाले होते. मात्र, सोंगणीला आलेले सोयाबीनचे पीकही पाण्यात गेले आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष आणि डाळिंब या पिकाबरोबरच सोयाबीन आणि मका हे पीक घेतले जात असते. यंदाच्या वर्षी मका पीक आणि सोयाबीन पीक हे दोन्ही मुसळधार पावसात टिकणारे पीक असतांना अत्यंत वाईट स्थिती निर्माण झाली आहे. हजारो हेक्टर सोयाबीन ही पाण्यात सडून गेली आहे.
यंदाच्या वर्षी हंगामी पिकाचे झालेले नुकसान पाहता, खाद्यतेल आणि पशू खाद्य महाग झाल्याने दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
सोयाबीन या पिकाच्या संदर्भात हेक्टरी 80 ते 85 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकरी याबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत असून दुबार पंचनामे करून मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नाशिकच्या सिन्नर, निफाड, येवला, चांदवड, मालेगाव या भागात सलग दोन दिवस मुसळधार पावसाने जोर धरला असल्याने शेती पीक पूर्णतः पाण्यात आहे.
खरंतर सोयाबीन हे पीक ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी महत्वाचे ठरत असते, पण यंदा सोयाबीन पीकही पाण्यात गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आहे.
सोयाबीन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करून मदत मिळाली नसून पुनः पंचनामे करण्याची वेळ आली आहे. मायबाप सरकारने आता ओला दुष्काळ जाहीर करून भरघोस मदत करणे आवश्यक आहे. – प्रशांत नागरे, शेतकरी, निफाड.