अर्थमंत्री म्हणून फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प, पण त्याआधी जनतेला केलंय हे आवाहन
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे अधिवेशन किती दिवसाचे असेल याचा निर्णय होईल. मात्र, त्याची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत अर्थसंकल्प मांडला. उद्या शनिवारी मुंबई महापालिकेचा 2023-2024 या वर्षाचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इकबालसिंग चहल सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून कोणत्या मोठ्या घोषणा होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक मोठी घोषणा केली आहे. केंद्र आणि महापालिकेच्या अर्थसंकल्पानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे अधिवेशन किती दिवसाचे असेल याचा निर्णय होईल. मात्र, त्याची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांना योग्य वेळेत आपले प्रश्न, लक्षवेधी सूचना तसेच प्रस्ताव ऑनलाईन पाठविण्याच्या सूचना विधिमंडळाकडून पाठविण्यात आल्या आहेत.
विधानभवनातून मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांना आपले प्रश्न वेळेत पाठवावेत याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. हे प्रश्न आल्यानंतर त्याची विभागवार यादी करण्यात येईल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये अधिवेशनाचा निश्चित कालावधी ठरविण्यात येईल. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान तीन आठवडे होण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले. शिंदे सरकारमधील पालकमंत्री यांनी आपापल्या जिल्ह्याच्या मागण्या विचारता घेऊन त्यानुसार वार्षिक आराखडा तयार केला असून तो अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्याचा विचार अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी पदे भूषविली आहेत. पण, अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. आमदार असताना त्यांनी ‘अर्थसंकल्प कसा वाचावा’ हे पुस्तक लिहिले आहे. अर्थसंकल्पावर अनेक व्याख्यानेही त्यांनी दिली आहेत. मात्र, यंदा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे. आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात जनतेच्या सूचना असाव्यात म्हणून त्यांनी थेट जनतेच्या सूचना आणि संकल्पना मागविल्या आहेत. लोकांना आपल्या संकल्पना मांडण्यासाठी http://bit.ly/MahaBudget23 हे संकेतस्थळही उपलब्ध करून देण्यात आले आहे.