Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात होणाऱ्या आरोपांवर अखेर किशोरी पेडणेकर यांनी काय उत्तर दिलं?
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात झालेल्या आरोपांवर अखेर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. दिशा सालियानच्या आई-वडिलांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर होतोय. त्यावर किशोरी पेडणेकर बोलल्या आहेत.

पाच वर्षानंतर दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुलीची आत्महत्या नाही, तर हत्या आहे असं त्यांचा दावा आहे. आदित्य ठाकरे या प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यावर आता किशोरी पेडणेकर बोलल्या आहेत. ‘दिशा सालियानचे आई-वडिल दबावाखाली आहेत’ असं किशोरी पेडणकेर यांनी म्हटलं आहे. “मूळात हे संपूर्ण मॅटर कोर्टात आहे. ज्या गोष्टी घडल्या नाहीत, त्या गोष्टी घडल्यात असं ज्याचं म्हणणं आहे, त्यांना रीतसर कोर्टातून उत्तर दिलं जाईल” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
किशोरी पेडणेकर यांनी नजरकैदेत ठेवलं, असा आरोप दिशाच्या वडिलांनी केला आहे. त्यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “याचा पोलीस तपास करतील. नजरकैद म्हणतात ते वेगळं असतं. अशा गोष्टी माझ्या पक्षात, माझ्या खानदानात कधी झाल्या नाहीत, त्यामुळे मला हे मान्य नाही” “मी ज्यावेळी महापौर होती, त्यावेळी तिचे आई-वडिल चार-चारवेळा माझ्या ऑफिसला आले होते. एकदा येऊन बघा आम्ही कशा हालतमध्ये राहतो, आम्हाला गाईड करा असं म्हणाले होते. ज्यावेळी मी त्यांच्या घरी गेले तेव्हा एकटी गेले नव्हते” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
‘माझ्यासोबत पोलीस, मीडिया होते’
“माझ्यासोबत पोलीस, मीडिया होते. महिला आयोगाच्या दोन सदस्य होत्या. ज्या अध्यक्ष होत्या, त्या येणार होत्या. पण ऐनवेळी काम निघाल्याने त्यांनी येणं रद्द केलं. स्थानिक नगरसेवक अमेय घोले सोबत होता. तो इमारतीखाली थांबलेला” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. “चर्चेमध्ये त्यांचं एक वाक्य होतं, आमच्या मुलीची बदनामी चालू आहे, ती होऊ नये. आम्हला जगायला द्या. आमच्या मुलीने आत्महत्या केलीय असं त्याचं म्हणणं होतं. त्यावर मी त्यांना म्हणाला की, ती माझी ऑथोरिटी नाही, पोलीस,महिला आयोग, राज्यपालांच्या ती ऑथोरिटी आहे. तुमच दु:ख मी समजू शकते”
‘आई-वडील दबावाखाली’
“पाच वर्षानंतर आता असं काय घडलं? कोण घडवतय का? कोण त्यांना भाग पडतय? आई वडील दबावाखाली आहेत असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. “पीएम रिपोर्ट सगळ्या महत्वाचा आहे किंवा मुंबई पोलिसांवर कोणताही अविश्वास दाखवत येणार नाही. अनेक गुन्हे उघडीस आणलेले आहेत. सीडीआर रिपोर्ट जायचं बाकी आहे. यामध्ये जाणून बुजून गोवल गेलं आहे. आदित्य ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ आहे, तो बाहेर येईल” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.