बाप्पाने भक्तांचं ऐकलं, पुढच्या वर्षी खरोखर गणपती लवकर येणार, 2025 मध्ये ‘या’ तारखेला गणेश चतुर्थी
पुढच्या वर्षी बाप्पा खरोखरच लवकर येणार आहेत. येत्या 2025 या वर्षात गणपतीचं आगमन 11 दिवस आधी होणार आहे आणि विशेष म्हणजे भक्तांच्या घरी जास्त दिवस विराजमानही असणार आहेत.
Ganesh Chaturthi 2025 Date : दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज अनंत चतुर्दशी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. यामुळे सर्वत्र गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सर्वत्र पाहायला मिळत आहे. सर्वच गणेशभक्त हे ला़डक्या बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर ये अशी साद घालताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का? पुढच्या वर्षी बाप्पा खरोखरच लवकर येणार आहेत. येत्या 2025 या वर्षात गणपतीचं आगमन 11 दिवस आधी होणार आहे.
पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 2025 या वर्षात आपले लाडके गणपती बाप्पा 27 ऑगस्टला विराजमान होणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी बुधवारी 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आहे. तर गौरी-गणपती विसर्जन हे 2 सप्टेंबर 2025 रोजी असणार आहे.
27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 पर्यंत साजरा होणार गणेशोत्सव
ऑगस्ट महिन्यात 31 दिवस आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी गौरी गणपती तब्बल 7 दिवस भक्तांच्या घरी विराजमान असणार आहेत. तर अनंत चतुर्दशी ही 6 सप्टेंबर 2025 रोजी आहे. पुढील वर्षी 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 रोजी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यानुसार गणपती बाप्पा हे 11 दिवस विराजमान असणार आहेत.
2027 मध्ये बाप्पांचे आगमन 10 दिवस
तर दुसरीकडे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यानुसार 2026 ला गणेश चतुर्थी ही 14 सप्टेंबरला असणार आहे. 2025 च्या तारखेनुसार गणपती बाप्पा तब्बल 24 दिवस उशिराने येणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना जास्त वाट पाहावी लागणार आहे. तसेच 2027 मध्ये बाप्पांचे आगमन हे 4 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे 2026 च्या तुलनेत 2027 मध्ये बाप्पांचे आगमन 10 दिवस लवकर होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्राच्या महाउत्सवाची अशी ओळख असलेल्या गणपती विसर्जनाची आज सांगता होणार आहे. सध्या लालबागमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच लालबागमध्ये सध्या पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा आणि सेवा केल्यावर आज त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे. सध्या लालबागमधील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरात ख्याती असलेल्या लालबागचा राजा, गणेश गल्ली यांसह अनेक प्रतिष्ठीत गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.