Construction | गोंदिया-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम, चार महिन्यांत 8 मृत्यू, 30 जखमी; रोड सेफ्टीकडे कंपनीचे दुर्लक्ष
रस्ते अपघाता संदर्भात साकोली आणि डुगीपार पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र कुठलीही कारवाई संबंधित कंपनीवर न झाल्याने सुचिता आगाशे, लता दुरुगकर, सुरेखा साखरे, जितेंद्र बोरकर यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर रस्ते बांधकाम सुरू आहे. यामुळं गेल्या चार महिन्यांत 8 लोकांचा मृत्यू तर 30 च्यावर जखमी झाले आहेत. रोड सेफ्टीकडे बांधकाम कंपनी करीत आहे. महिलांनी पुढाकार घेत पोलिसात याची तक्रार केली आहे. कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची इशारा दिला आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर साकोली आणि देवरी तालुक्यात फ्लाय ओव्हर चे काम सुरू आहे. या ठिकाणी ब्रिजचे बांधकाम करताना रोड सेफ्टीकडे (Road Safety) दुर्लक्ष होत आहे. गेल्या चार महिन्यांत आठ लोकांना आपला जीव गमवावा लागला. तीसच्या वर लोक जखमी झाले आहेत. पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. साकोली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या सुचिता आगाशे (Suchita Agashe) यांनी या संदर्भात साकोली पोलीस (Sakoli Police) ठाण्यात बांधकाम कंपनी विरुद्ध तक्रार दाखल केली. बांधकाम बंद करण्याची मागणी केली आहे.
कामाच्या ठिकाणी नाहीत सुचनाफलक
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातूनन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अग्रवाल कंपनी फुलाचे बांधकाम करीत आहे. रस्ते सुरक्षेचेकडे दुर्लक्ष करीत असल्याने आठ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्या ठिकाणी हे कामे सुरू आहेत अशा ठिकाणी कुठलेही सूचना फलक किंवा रिफ्लेकटर लावलेले नाहीत. रोज या ठिकाणी अपघातात होतात. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजूला केलेले खोदकाम दिसत नाही. त्यामुळं चार चाकी किंवा दुचाकी चालक रस्त्याखाली कोसळत असल्याने याला जबाबदार कोण असा प्रश्न पडला आहे. रस्ते अपघाता संदर्भात साकोली आणि डुगीपार पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र कुठलीही कारवाई संबंधित कंपनीवर न झाल्याने सुचिता आगाशे, लता दुरुगकर, सुरेखा साखरे, जितेंद्र बोरकर यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
झाडे पाडली रस्त्यावर
रस्त्याचे आणि पुलाचे बांधकाम सुरू असताना रस्त्यावरील झाडे कापताना झाडे बाजूला न पाडता रस्त्याच्या दिशेने पाडण्यात आली. त्यात काहींना आपले हात-पाय गमवावे लागले. अनेक गाड्यांचा चुरडा देखील झाला. दुसरीकडे रस्त्यावरून चालताना पुरुषांना हानी झाल्याने महिलांचा कुंकू पुसला गेलाय. यामुळं महिला आक्रमक झाल्या आहेत. अग्रवाल कंपनी रस्त्याचे बांधकाम करताना सुरक्षा देत नसेल तर अशा कंपनीने बांधकाम सोडावे अशी मागणी महिलांनी केली आहे. या संदर्भात महिला आता केंद्रीय परिवहन तथा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार आहेत. त्यामुळं ते काय कारवाई करतात, याकडं सर्वांच लक्ष लागलंय.