हत्तीच्या हल्ल्यात एक ठार, एक जखमी, शासकीय अनुदानाचं काय?
रात्रीला हत्तीचा कळप पळवून लावण्यासाठी डफळी वाजविली आणि मशाली पेटवल्या.
शाहिद पठाण, Tv9 मराठी, प्रतिनिधी, गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध वन परिक्षत्रातील तिडका जंगल आहे. या तिडक्याच्या शेत शिवारात हत्तींनी हल्ला केला. या हल्यामध्ये तिडका येथील सुरेंद्र जेठू कळईबाग (वय 55) या आदिवासी शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जवरू कोरेटी (वय 45) हा आदिवासी शेतकरी जखमी झाला. या घटनेची पालकमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी दखल घेत अनुदान जाहीर केलं आहे. अर्जुनी-मोर तालुक्यातील तिडका या आदिवासीबहुल गावातील परिसरामध्ये मागील 29 तारखेपासून हत्तींचे वास्तव्य आहे. आदिवासींच्या उपजीविकेचे साधन म्हणून शेतीचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
डफळी वाजविली, मशाली पेटविल्या
हत्तीच्या होणाऱ्या नुकसानीपासून आपल्या शेतीचे रक्षण व्हावे याकरिता तिडका वासियांनी एकत्र आले. वनविभागाच्या सूचनेनुसार आपल्या शेतीचे रक्षण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी काल रात्रीला हत्तीचा कळप पळवून लावण्यासाठी डफळी वाजविली आणि मशाली पेटवल्या. हत्तीचा कळप त्यामुळं जंगलाच्या दिशेने पळून गेला.
सकाळी जंगलातील हत्तीमुळे आपल्या शेताची पाहणी करण्यासाठी 25-30 शेतकरी शेत शिवारामध्ये गेले. लोकांचा समूह पाहून आराम करत असलेल्या हत्त्यांनी अचानक गावकऱ्यांवर हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये एक आदिवासी शेतकरी जाग्यावरच ठार झाला. एक शेतकरी जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांच्या मदतीने मृतदेह नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले.
प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
जखमी व्यक्तीलासुद्धा नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले. घटना ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडली. असा आरोप गावकऱ्यांनी केलाय. हत्तीच्या कळपाचा तसेच वाघाचा व इतर हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त वन विभागाच्या वतीने करण्यात यावा, अशी जोरदार मागणी शेतकरी रतिराम व सुखदेव मिरी यांनी केली.
शासकीय अनुदान जाहीर
हत्तीच्या हल्ल्यात मृत झालेल्या शेतकऱ्याला पालकमंत्री सुधीर मुनगट्टीवारद्वारे अनुदान जाहीर करण्यात आलं. हत्तीच्या हल्ल्यात एक आदिवासी शेतकरी ठार तर एक जण जखमी झाला होता. अर्जुनी-मोर तालुक्यातील तिडका जब्बार खेडा परिसरातील घटना घडली.