विद्यार्थी मारहाण प्रकरण, दोन शिक्षक निलंबित, आता संघटनेची मागणी काय?
सौरभला गावी घेऊन आले. विचारपूस केली असता सौरभने आपल्याला शिक्षकानं मारहाण केल्याचं सांगितलं. याची तक्रार त्यांनी देवरी येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना केली.
शाहिद पठाण, गोंदिया : गोंदियात इंग्रजी शाळेत शिक्षकाद्वारे चिमुकल्याला मारहाण प्रकरण चांगलेच तापले. प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुलांचे पालकत्व स्वीकारले. आता त्यांनी या विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारा, अशी मागणी देवरी येथील बिरसा ब्रिगेड संघटनेने केली. प्रकल्प अधिकाऱ्याला सूचक इशारा देण्यात आला आहे. आदिवासी समाजाच्या मुलाचे शाळेत होणारे शोषण प्रकरण लवकर निकाली काढावे. अशा प्रकरणात पीडित विद्यार्थ्याला आर्थिक सहाय्य पुरवावे. FIR त्वरित रजिस्टर व्हावे, असंही संघटनेचं म्हणणं आहे. विद्यार्थ्याला मारहाण झालेल्या शाळेतील मुख्याध्यापक, संचालक यांच्याविरोधात गुन्हा नोंद व्हावा. अन्यथा मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा चेतन उईके व मधुकर दिहारी यांनी दिला आहे.
काठी, प्लास्टिक पाईपने मारहाण
सौरभ रामेश्वर उईके हा गोंदिया प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल शाळेत शिकतो. त्याला नंबर आरटीईच्या नियमांतर्गत लागला. सहावीत शिकणारा सौरभ हा मुळचा देवरी तालुक्यातील मुरपारचा रहिवासी. शाळेत सकाळी शारीरिक सराव सुरू होता. शाळेतील शिक्षकाने शुल्लक कारणावरून सौरभला काठी व प्लास्टिकच्या पाईपनं मारहाण केली. सौरभ मारहाणीमुळं बेशुद्ध पडला. याची माहिती त्याच्या वडिलांना झाली. त्यांनी शाळेत धाव घेतली.
मुलाच्या वडिलांची पोलिसांत धाव
सौरभला गावी घेऊन आले. विचारपूस केली असता सौरभने आपल्याला शिक्षकानं मारहाण केल्याचं सांगितलं. याची तक्रार त्यांनी देवरी येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना केली. मात्र काही दिवस झाले तरी काही कार्यवाही झाली नाही. त्यामुळं सौरभच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. मारहाण करणाऱ्या शिक्षकांविरोधात व शाळा व्यवस्थापनाविरुद्ध पोलीस तक्रार केली.
दोन शिक्षक निलंबित
आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले. चौकशी समितीमध्ये सौरभ याला शिक्षकाकडून मारहाण केल्याचे समोर आले. शिक्षक दोषी असल्याने आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी शाळा प्रशासनाला पत्र दिले.संबंधित शिक्षकांवर तात्काळ कार्यवाही करावी. शाळा प्रशासनाने दोन्ही शिक्षकांना निलंबित केले.अशी माहिती आदिवासी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी दिली.