सिंचन योजनेच्या लोकार्पणासाठी आलेले आमदार परतले, गावकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून का केला विरोध?
गावकऱ्यांनी मार्गावरील झाडे तोडून रास्ता रोको केला. त्यांनी काळे झेंडे दाखवून मुर्दाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. आमदाराला गावात येऊ दिले नाही.
शाहिद पठाण, प्रतिनिधी, गोंदिया, ६ सप्टेंबर २०२३ : आमगाव-देवरी विधानसभेत काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे आहेत. त्यांना चार वर्षे झालीत. त्यातील दोन वर्षे कोरोनात गेली. त्यामुळे विकासकामे काही करता आली नाही. याचा रोष त्यांच्या विधानसभा क्षेत्रात दिसून येतो. आमदार सहसराम कोरोटे हे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यावर आता भर देत आहेत, असा आरोप माजी आमदार संजय पुराम यांनी केला. शिवाय काही गावकरीही आमदार सहसराम कोरोटे यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येते. असाचं एक प्रसंग नुकताच घडला. सालेकसा तालुक्यातील पांढरवाणी गावात उपसा सिंचन त्यांच्या लोकार्पणसाठी आमदार कोरोटे पोहोचले. मात्र ग्रामस्थ आक्रमक झाले. हे अपूर्ण काम आहे. त्यामुळे या कामाचे लोकार्पण करू नका, असं लोकांनी सांगितलं. शिवाय अपूर्ण कामाचे लोकार्पण करण्यासाठी आमदार कोरोटे यांनी ग्रामपंचयायतीला विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या जात नाहीत. म्हणून गावकऱ्यांनी आमदारांना विरोध केला. गावकऱ्यांनी मार्गावरील झाडे तोडून रास्ता रोको केला. त्यांनी काळे झेंडे दाखवून मुर्दाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. आमदाराला गावात येऊ दिले नाही.
आमगाव-देवरीचे आमदार सहसराम कोरोटे हे सध्या भूमिपूजन आणि अपूर्ण कामाचे उद्घाटनासाठी संपूर्ण परिसरात लोकप्रिय आहेत. असाच एक प्रकार सालेकसा तालुक्यातील गावत उघडकीस आला. पांढरवाणीत उपसा सिंचनचे कुणालाही न सांगता लोकार्पण करण्यासाठी आले होते. संतप्त गावकरी आणि शेतकऱ्यांनी गावाच्या रस्त्यावर झाडे कापून रस्त्ता अडवला. काळे झेंडे दाखवित आणि घोषणाबाजी करून लोकार्पण करता आलेल्या आमदार कोरोटे यांना परत पाठवले. सरपंच संजू ऊईके आणि शेतकरी अरुण टेंभरे यांनी या लोकार्पणाला विरोध केला.
२५ टक्के काम अपूर्ण
माजी आमदार संजय पुराम म्हणाले, काम पूर्ण झाल्यानंतर विकासकामांचे लोकार्पण करतात. पण, विद्यमान आमदार यांनी जे काही लोकार्पण केले त्याचा संबंध त्यांच्याशी येत नाही. सिंचन योजनेचे अर्धे काम माझ्या कार्यकाळात झाले. अजून २५ टक्के काम अपूर्ण आहे. लोकांना विरोध केला. तरी त्याठिकाणी जायला नको होता. ते आमदार आहेत. त्यांनी कुठल्या कामाचे लोकार्पण करावे हा त्यांचा प्रश्न आहे. चिचगड उपकेंद्रात सुविधा नसताना लोकार्पण केले. बेरोजगारी या विषयावर ते निवडून आलेत. पाच बेरोजगारांनी त्यांनी नोकरी दिली आहे का, असा सवाल पुराम यांनी केला.
बेगाने शादीमे अब्दुल्ला दिवाना
या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात मी आमदार असताना रोजगार दिले आहे. कोरोटे यांनी कोणतीही विकासकामं केली नाहीत. जी काम मंजूर आहेत त्या कामांचे लोकार्पण ते करत आहेत. बेगाने शादीमे अब्दुल्ला दिवाना असं काम सुरू आहे. येणाऱ्या काळात जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय पुराम यांनी दिला.
तोपर्यंत लोकार्पण करू नये
भूमिपूजन किंवा अपूर्ण कामाच्या उद्घाटनासाठी आमदार येतात. शेतकरी आणि ग्रामस्थ हे आमदार कार्यालयातील समस्यांसाठी जाऊन अर्ज केला. यासह जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही यासंदर्भात विनंती केली केली होती. पण शेतकरी आणि ग्रामस्थांच्या विविध समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पांढरवाणीचा उपसा सिंचनाच्या लोकार्पणावेळी काळे झेंडे दाखवले. मुर्दाबाद घोषणाबाजी करत आमदारांना रिकाम्या हाताने परतवले. उपसा सिंचनचे पाणी शेतात येत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाने लोकार्पण करू नये, अशी भूमिका घेतली.