Hingoli | पेट्रोल पंप बंद राहण्याची अफवा, हिंगोलीत नागरिकांची तुफान गर्दी, वसमत शहरातील प्रकार
दरम्यान, पेट्रोलपंप चालकांनी तहसीलदार यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. त्यामुळे तहसीलदारांनीही सोशल मीडियावर संदेश टाकत वाहनधारकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर स्वतः मॅसेज करून लोकांमधील गैरसमज दूर केले.
हिंगोली | पेट्रोल पंपावर पूढचे काही दिवस इंधन मिळणार नाही या सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवेमुळे हिंगोलीत नागरिकांची (Hingoli citizens) चांगलीच तारांबळ उडाली. वसमत शहरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी तुफान गर्दी करायला सुरुवात केली. शुक्रवारी रात्रीतून नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल (Petrol) भरून घेण्यास सुरुवात केली. इंधनाचा तुटवडा होऊन पेट्रोल पंप बंद होऊ शकतात, अशा चर्चा कानोकानी पसरल्या (Rumors spread) आणि नागरिकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे वसतमधील जवळपास सर्वच पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर पंप मालकांनी इंधन तुटवड्यासंबंधीची अफवा आहे, त्यावर विश्वास ठेवू नका असे लोकांना समजावून सांगितले. तरीही पेट्रोल भरायला आलेल्या नागरिकांनी वाहनात पेट्रोल भरल्यानंतरच घरचा रस्ता धरला.
इंधनाचा तुटवडा होण्याची अफवा
शुक्रवारी दुपारपासूनच वसमत शहरात ही अफवा पसरण्यास सुरुवात झाली. संध्याकाळनंतर ग्राहकांची पंपांवर एकाएकी गर्दी वाढू लागली. त्यामुळे पंपावरील कर्मचारीही चक्रावून गेले. नंतर एका वाहन धारकाने या गर्दीमागचे कारण सांगितले. पेट्रोलपंप मालकांनी याची तत्काळ दखल घेत, नागरिकांचा गैरसमज दूर केला. तसेच पेट्रोलपंपांवर भरपूर इंधन साठा असल्याचे आश्वासन दिले. नागरिकांनी अशी गर्दी न करण्याचे आवाहन केले. पंपांवर अचानक गर्दी वाढू लागल्याने शुक्रवारी काही काळ शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते.
तहसीलदारांनाही आवाहन करावे लागले
दरम्यान, पेट्रोलपंप चालकांनी तहसीलदार यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. त्यामुळे तहसीलदारांनीही सोशल मीडियावर संदेश टाकत वाहनधारकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर स्वतः मॅसेज करून लोकांमधील गैरसमज दूर केले. त्यामुळे शुक्रवारी रात्रीच गर्दी कमी झाली. मात्र शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोलपंपांवर काही ठिकाणी रांगा दिसू लागल्या. आता या अफवा पसरवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
इतर बातम्या-