Hingoli | ‘देशाशी गद्दारी करणाऱ्याला जेलमध्ये टाका’ किरीट सोमय्यांविरोधात शिवसेनेच्या घोषणा, हिंगोलीत जोडे मारो आंदोलन
किरीट सोमय्या यांच्याविरोधात मराठवाड्यात शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. औरंगाबादमध्ये क्रांती चौकात शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. तर नांदेडमध्येही किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. परभणीतदेखील किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
हिंगोली | आयएनएस विक्रांत (INS Vikrant) घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज राज्यभरात शिवसैनिकांकडून (Hingoli ShivSena) आंदोलन करण्यात येत आहे. हिंगोलीतदेखील शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यात आला. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेला वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा किरीट सोमय्यांनी घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित तुरुंगात टाकण्यात यावे, या मागणीसाठी आमदार संतोष बांगर, हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी मागणी केली आहे. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात हिंगोली येथे आंदोलन करण्यात आले. आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या निधीत भ्रष्टाचार करणाऱ्या किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन यावेळी करण्यात आले. शिवसैनिकांनी यावेळी सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारले आणि त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
संजय राऊतांनी उघड केला घोटाळा
2013-14 साली भारतीय संरक्षण खात्याची आयएनएस विक्रांत हे जहाज भंगारात काढले जाणार होते. त्यावेळी त्यात संऱक्षण खात्याचे संग्रहालय व्हावे, अशी मागणी पुढे आली. हे संग्रहालय उभे करण्यासाठी राज्य सरकारला 200 कोटी रुपये उभे करून देण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जनतेकडून निधी जमा केला. त्या वेळी जवळपास 57 कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ही रक्कम अद्याप राज्य सरकारकडे जमा झालेली नाही, असा आरोप संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे. त्यावेळी लाखो मुंबईकरांनी देशभावनेपोटी सढळ हाताने दान केले. हा लोकभावनेशी, देशभावनेशी खेळ असल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. यएनएस विक्रांत घोटाळा उघड करण्यासाठी संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर गुरुवारीदेखील या घोटाळ्याचा अधिक तपशील दिला. विक्रांतच्या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. देशभरात पैसा जमा केला. महाराष्ट्रात 57 कोटींचा आकडा सांगितला. मात्र त्यापेक्षा जास्त निधी सोमय्यांनी जमा केला. हा पैसा निवडणुकीत वापरला. पीएमसी बँकेच्या माध्यमातून चलनातून आणला गेला. नील सोमय्यांच्या उद्योगात वापरला गेला. हे पैसे गोळा करण्यासाठी 711 मोठे बॉक्स वापरले गेले. हे बॉक्स त्यांच्या निलम नगरमधील कार्यालयात ठएवले. त्या पैशाचे बंडल बांधण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते बोलावले होते. हे एक प्रकारचं मनी लाँड्रिंगच आहे, असा आरोप संजय राऊत यांनी गुरुवारी केला.
औरंगाबाद, नांदेडमध्येही निदर्शने
किरीट सोमय्या यांच्याविरोधात मराठवाड्यात शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. औरंगाबादमध्ये क्रांती चौकात शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. तर नांदेडमध्येही किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. परभणीतदेखील किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
इतर बातम्या-