राज्यात गारपीठ आणि अवकाळी पाऊसामुळे किती नुकसान? सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीच सांगितली
राज्यातील आठ जिल्हे अवकाळी पाऊस आणि गारपीट यामध्ये आर्थिक संकटात सापडले असून मोठे नुकसान झाले आहे. तात्काळ मदतीबाबतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस ( Heavy Rain ) आणि गारपीट होत आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून खरीपानंतर आता रब्बीचे पीकही नैसर्गिक संकटात सापडले आहे. त्याच संदर्भात सत्ताधारांना विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक होत घेरलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadanvis ) यांनी विधानसभेत आकडेवारी सांगत माहिती दिली आहे. त्यावेळी शेतकऱ्यांचा मुद्दा आहे कोणीही राजकारण करू नये असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना लवकरच मदत केली जाईल असे आश्वासित केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी सादर करत असतांना राज्यातील आठ जिल्ह्यात अवकाळी पाऊसाचा फटका बसल्याचे म्हंटले आहे. त्यामध्ये आठ जिल्हयाचे एकूण 13 हजार 729 हेक्टर इतकं नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. हीच माहिती आणखी वाढण्याची शक्यताही सादर केला आहे.
यावेळी पालघर जिल्ह्यात विक्रम गड आणि जव्हार मध्ये 760 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा आणि काजूच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात 2 हजार 685 हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात गहू, भाजीपाला, द्राक्षबागा आणि आंबा पिकाचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे.
त्यानंतर धुळे जी जिल्ह्यात नुकसान झाल्याचे म्हंटले आहे. तिथे 3 हजार 144 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यात मका, ज्वारी, गहू, हरभरा, पपई आणि केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर नंदुरबार जिल्ह्यला ही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामध्ये नवापुर, अक्कलकुवा आणि तळोदा या भागात नुकसान झाले आहे.
नंदुरबारमधील 1 हजार 576 हेक्टर इतके क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये गहू, हरभरा, मका, ज्वारी, आंबा आणि केळी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यानंतर जळगावमध्येही नुकसान झाले आहे. त्यात 214 हेक्टर क्षेत्राचे नुकसाण झाले आहे. याशिवाय राज्यातील सर्वाधिक नुकसान नगरमध्ये झाले आहे.
नगर जिल्ह्यात 4 हजार 100 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये मका, गहू आणि कांदा यांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये राहुरी, नेवासा, अकोले आणि कोपरगाव या तालुक्यात नुकसान झाले आहे.
यानंतर बुलढाणा येथेही मोठे नुकसान झाले आहे. 775 हेक्टरवरील क्षेत्र नुकसानीचे आहे. त्यामध्ये रब्बीच्या पिकांचा समावेश असून वाशिमला देखील 475 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा आणि फळबागा धोक्यात आल्या आहेत.
दरम्यान ही आकडेवारी सादर करत असतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मदत करण्यासाठी दुपारपर्यन्त माहिती घेऊन निवेदन देऊ असे म्हंटले आहे. त्यामध्ये मदतीचा प्रस्ताव देखील मागितला आहे. त्यानंतर दुपारी याबाबत निवेदन सादर केलं जाणार असल्याचे स्पष्ट करत विरोधकांनी राजकारण करू नये म्हणत टोला लगावला आहे.