महाराष्ट्रात धुवाँधार, तब्बल सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, बाहेर फिरायला जात असाल तर ही बातमी आधी वाचा
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालीय. विशेष म्हणजे हवामान विभागाने राज्यातील तब्बल सात जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबई | 26 जुलै 2023 : महाराष्ट्रातील आज अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस पडतोय. हवामान विभागाकडून पावसाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली आहे. त्यामुळे वायव्य दिशेला तिच्या हालचाली होण्याची शक्यता आहे. या हालचालींमुळे महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस महत्त्वाचे आहेत. राज्यात पुढच्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, गडचिरोली या सात जिल्ह्यांना आजच्या दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उद्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर, सातारा, पुणे, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा अलर्ट आज आणि उद्यासाठी असणार आहे. तर 28, 29 जुलैसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्यापासून सलग तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 30 जुलैसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्याला रेड आणि ऑरेंज अलर्ट
पुणे जिल्ह्यासाठी आज आणि उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या दोन दिवसांसाठी पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर त्यापुढच्या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोल्हापुरातही मुसळधार पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या प्रचंड पाऊस पडतोय. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. कोल्हापूर जिल्ह्याला आजसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर त्यापुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
26/7: बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता pl kp watch on hevy rainfall alerts in state in next 5 days;Mumbai,Thane Raigad Rtn,ghat areas of Pune, Satara & more https://t.co/XVjLG7bduz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 26, 2023
सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट
सातारा जिल्ह्यांसाठी आजचा आणि उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी केला. त्यानंतर एक दिवसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंतर पुढच्या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात ऑरेंज अलर्ट
भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, कोल्हापूर या जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.