maharashtra rain update: पुण्यात रेड अलर्ट, पुणे, रायगड, ठाणे, सांगलीत शाळांनाही सुट्टी, राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतीमुसळधार कोसळणार, हवामान खात्याचे अपडेट जाणून घ्या
maharashtra rain update: पिंपरी चिंचवड शहराची आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रात्रीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे.गेल्या 12 तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पावसाने तुफान बॅटिंग केल्याने धरणाच्या पाणी साठ्यात12 तासांमध्ये थेट 10 टक्के वाढ झाली आहे
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर राज्यात अजूनही कायम आहे. हवामान विभागाने राज्यातील पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट आहे. पुणे, रायगड, ठाणे, सांगलीत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन गुरुवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पुण्यात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश काढले आहेत.
पुणे, रायगड, पालघर, सांगलीत शाळा बंद
येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केल्यामुळे शाळा बंदचा निर्णय सांगली प्रशासनानेही घेतला आहे. राज्य सरकारचा अलमट्टी धरणाशी पाणी सोडण्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही. शिवाय कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात करण्यात येत आहे,असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.तसेच राज्य सरकारने तातडीने अलमट्टी धरणातून पाणी साठा कमी करण्याबाबत कर्नाटक सरकारवर दबाव आणला नाही,तर यंदा देखील सांगलीला महापुराचा फटका बसेल, अशी भीती कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली
मुंबईत पावसाची संततधार
मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरु आहे. कल्याण डोंबिवली पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे अनेक सखल भागात आणि रस्त्यावर पाणी साचण्याची घटना घडली आहे. मात्र अधूनमधून पावसाचा जोर कमी होत असल्याने पाण्याचा निचरा देखील होत आहे. बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने रात्री व आज पहाटे देखील आपला जोर कायम ठेवला आहे. मध्यरात्रीपासून कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यानंतर पहाटे देखील पावसाचा जोर कायम असल्याने पहाटे कामावर जाणाऱ्या चाकरमानी लोकांना रिक्षा मिळत नसल्याने हाल होत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये रात्री विक्रमी पाऊस
पिंपरी चिंचवड शहराची आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रात्रीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे.गेल्या 12 तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पावसाने तुफान बॅटिंग केल्याने धरणाच्या पाणी साठ्यात 12 तासांमध्ये थेट 10 टक्के वाढ झाली आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजता धरणाचा पाणी साठा 57.70 टक्के इतका होता, तो आता 67.80 टक्के झाला आहे. गेली अनेक वर्षे एका रात्रीत इतका तुफान पाऊस बरसल्याची नोंद नव्हती.
पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग
लोणावळ्यात पावसाने यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद केली आहे. गेल्या चोवीस तासांत तब्बल 370 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. म्हणजे 14.57 इंच इतका पाऊस कोसळला आहे. या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे बोलले जाते आहे. या एक जूनपासून 2971 मिलीमीटर इतका पाऊस बरसला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2638 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
खडकवासला धरणातून सोडलेला पाण्याचा विसर्ग सर्व दारे उघडण्यात आली आहेतव्हिडिओ: @chaitralicMT @mataonline @Hosalikar_KS @vineet_tropmet @ParagKMT @shree_brahmeMT @suneetMT @ShreedharLoniMT @anupamkashyapi @aparanjape pic.twitter.com/sRZSKTuAXR
— Chaitrali Chandorkar (@chaitralicMT) July 24, 2024
कोल्हापुरात पूरसदृश्य परिस्थिती
कोल्हापुरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली 43 फुटांवर गेले आहे. तर राधानगरी धरण देखील 98 टक्के पेक्षा जास्त भरले आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज दुपारपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत. कोल्हापूरकडून रत्नागिरीला जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.
पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली
भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत पाणी शिरले आहे. संगम पूल पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे. कॉर्पोरेशन जवळील पूल बंद होण्याची शक्यता आहे.
पुणे धरणसाठा
- खडकवासला १०० टक्के
- टेमघर ५७ टक्के
- वरसगाव ६३ टक्के
- पानशेत ७६ टक्के
रत्नागिरीत वेगवान वारे
रत्नागिरीत किनारपट्टी भागात दुसऱ्या दिवशी देखील वाऱ्याचे धुमशान सुरु आहे. किनारपट्टी भागात ताशी 55 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. पौर्णिमेनंतर किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे. अरबी समुद्रातील किनारपट्टी भागात आणखीन दोन दिवस वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, गुहागर दापोली, राजापूर, वेंगुर्ले, देवगड, मालवण या किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग अधिक आहे.