महायुतीत अनेक मतदारसंघात मित्रपक्षांच्या दावेदारीवरुन ठिणग्या
महायुतीत अनेक जागांवर दावेदारी सुरु झालीये. विद्यमान आमदाराच्या पक्षाला जागा सोडण्याच्या धोरणावर महायुतीत चर्चा झालीय. त्र इतरही अनेक उमेदवार समर्थनात बॅनरबाजी करत आहेत. इच्छूक उमेदवारांकडून जोरदार बॅनरबाजी सुरु आहे. अनेकांना आपल्यालाच उमेदवारी मिळणार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
जिथून जो आमदार असेल, ती जागा त्याच पक्षाला हे सूत्रं महायुतीत ठरलंय. मात्र तरीही अनेक मतदारसंघात मित्रपक्षांच्या दावेदारीवरुन ठिणग्या उडू लागल्या आहेत. नाशिकमधला नांदगाव मतदारसंघ. सध्या शिंदे गटाचे सुहास कांदे इथून आमदार आहेत. पण नांदगावात अजितदादा गटाच्या समीर भुजबळांचे बॅनर लागलेत. खुद्द छगन भुजबळांनीही नांदगावसाठी आपल्या पुतण्याला शुभेच्छा दिल्यात त्यावर आम्ही पण येवल्याची जागा मागायची का., असा सवाल शिंदे गटाचे मंत्री दादा भुसेंनी केला आहे.
2019 ला अखंड शिवसेनेच्या सुहास कांदेंविरोधात अखंड राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ उभे होते. पंकज भुजबळांचा 13 हजार 889 मतांनी पराभव झाला होता. वंचित आघाडीच्या उमेदवारालाही जवळपास साडे १३ हजार मतं पडली होती.
कोल्हापूरच्या कागलमध्ये अजित पवारांच्या हसन मुश्रीफांविरोधात शिंदे गटाच्या विरेंद्र मंडलिकांनी दंट थोपटण्याची तयारी केलीय. शिंदेंच्या शिवसेनेच्या युवासेनेचे निरीक्षक असलेल्या वीरेंद्र मांडलिकांनी समर्थकांचा मेळावाही बोलवला आहे. कागल मधील नैसर्गिक जागा शिवसेनेची त्यामुळे महायुतीत जागा शिवसेनेलाच मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह करणार. हसन मुश्रीफ यांनी कायम खेकड्याप्रमाणे माझे पाय ओढले. असंही ते म्हणाले.
2019 ला कागलमध्ये अखंड राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ विरुद्ध भाजपचे अपक्ष म्हणून लढलेले समरजीत घाटगे आणि अखंड शिवसेनेचे संजय घाटगेंमध्ये सामना झाल होता., मुश्रीफ28 हजार मतांनी जिंकले…तर अपक्ष समरजीत घाटगे दुसऱ्या स्थानी राहिले होते.
नगरमघल्या अकोलेच्या जागेवरूनही अजितदादा गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे आणि भाजपचे पिचड पिता-पुत्र आमने-सामने आलेत. अजित पवारांनी याआधी लहामटेंची उमेदवारी घोषित केलीये, पण ती घोषणा अवैध असल्याचा दावा पिचडांनी केलाय.
राष्ट्रवादीच्या घड्याळाची उमेदवारी माझीच फायनल आहे. बाकीच कोण कुठं जात याची मला काळजी करण्याच मला कारण नाही. पिचडांनी माझं काम करण्याची बिलकुल गरज नाही. पिचड जिकडे जातील त्या उमेदवाराचे १० ते २० हजाराने मतदान कमी होतील असं लहामटे यांनी म्हटलंय. 2019 ला राष्ट्रवादीच्या किरण लहामटेंनी भाजपच्या वैभव पिचडांचा जवळपास 57 हजार मतांनी पराभव केला होता.
कोल्हापूर उत्तर विधानसभेवरुन शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर आणि भाजपच्या कृष्णराज महाडिकांनी उभा दावा केला आहे. कोल्हापूर उत्तरची जागा महायुतीत शिवसेनेकडे आहे. राजेश क्षीरसागर शिंदेंकडे गेल्यानं यावर शिंदेंची शिवसेना दावा सांगतेय. पण त्याचजागी भाजपच्या धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिकांनी लढवण्याची इच्छा वर्तवलीय.
राजेश क्षीरसागर म्हणाले की, महायुतीत एकमेकांच्या पायात पाय घालणं चांगलं नाही. कृष्णराज महाडिक यांना त्यांच्या वडिलांनी समजावण्याची गरज आहे. माझा मुलगा देखील दक्षिणमधून तयारी करतोय मग मी सुद्धा त्याला दक्षिणमधून लढ म्हणायचं का? दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढायची आमच्या मुलाची तयारी आहे.
सोलापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचेच ३ इच्छूकांनी तिकीटावर दावा केला आहे. विद्यमान आमदार भाजपचे सुभाष देशमुख आहेत. पण यंदा भाजपचेच जिल्हा उपाध्यक्ष मळसिध्द मुगळेंनी यंदा भूमीपूत्रच आमदार होणार म्हणून बॅनर लावलेत. दुसरीकडे भाजपच्या सोमनाथ वैद्यांनी काही नगरसेवकांच्या सह्यांचं पत्र दाखवत तिकीटाची मागणी केलीय. गेल्यावेळी भाजपच्या सुभाष देशमुखांनी काँग्रेसच्या मौलानी सईद यांचा 29 हजारांनी पराभव केला होता.
सोलापूर शहर उत्तर विधानसभेतही भाजपच्या विजय देशमुखांच्या उमेदवारीला भाजपचेच माजी महापौरांसह, सभागृह नेता आणि अनेक नगरसेवकांनी आव्हान दिलंय. भाजपच्या ५ इच्छूकांनी मेळावा घेत २० वर्षांपासून आमदार राहणाऱ्या देशमुखांविरोधात तयारी सुरु केलीय. जालन्यातल्या घनसावंगीत ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण शिंदेंच्या सेनेते प्रवेश करणार आहेत.
गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या राजेश टोपेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिकमत उढाण लढले होते. 3 हजार 409 मतांनी राजेश टोपेंनी त्यांचा पराभव केला होता.
लातूरची उदगीर विधासनभा भाजपला मिळावी म्हणून स्थानिका नेत्यांनी दावेदारी सुरु केलीय. इथून सध्या अजित पवार गटाचे मंत्री संजय बनसोडे आमदार आहेत..पण स्थानिक भाजप नेत्यांनी मुंबईतल्या नेत्यांची भेट घेवून जागेचा आग्रह धरलाय. याआधी गेल्यावेळी भाजपकडून लढलेल्या सुधाकर भालेरावांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय.
नाशिकच्या चांदवड मतदारसंघात भाजपच्या दोन भावांमध्ये तिकीटासाठी संघर्ष रंगू शकतो. चांदवडमध्ये विद्यमान आमदार भाजपचे राहुल आहेर आहेत. पण गेल्या २ विधानसभा भावासाठी थांबल्याचं म्हणत त्यांचे बंधू केदा आहेर यांनी यावेळी दावा सांगितलाय. केदा आहेर यांच्याकडून विधानसभा मतदारसंघात प्रचाराला देखील सुरुवात झालीये. वरिष्ठ उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक असल्याच्या केदा आहेर यांच्या दाव्याने चांदवड देवळा मतदार संघात ट्विस्ट आलाय. 2019 ला चांदवडमध्ये भाजपचे राहुल आहेरांविरोधात काँग्रेसच्या शिरीषकुमार कोतवालांचा 26 हजार 537 मतांनी पराभव केला होता.