‘बाजारात चार आणे आणि राजकारणात xxx’, मराठा आंदोलकांनी ‘या’ नेत्याची किंमतच काढली
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला. नितेश राणे यांच्या त्या विधानावरून मराठा आंदोलकांनी नितेश राणे यांना थेट आव्हान दिलंय.
शंकर देवकुळे, सांगली | 2 नोव्हेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील सातत्याने टीका करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी दोन उपमुख्यमंत्री यांच्यापैकी एक उपमुख्यमंत्री काड्या करणारे आहेत अशी अप्रत्यक्ष टीका करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. जरांगे पाटील यांच्या या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिले. मात्र, नितेश राणे यांच्या विधानामुळे मराठा आंदोलक अधिक भडकले आहेत. सांगलीत मराठा समाजाच्या आंदोलकांनी नितेश राणे यांना थेट आव्हान दिलंय.
भाजप आमदार नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांचे हिंसेला समर्थन आहे का? जरांगे पाटील यांची स्क्रीप्ट कोण लिहून देत आहे? असा सवाल केला होता. शांततेची भाषा करणारे जरांगे पाटील आता राजकीय भाषा वापरतात अशी टीकाही त्यांनी केली होती. नितेश राणे यांच्या याच विधानावरून मराठा आंदोलक संतापले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून सांगलीमध्ये मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त मराठा समाज आंदोलकांनी नितेश राणे यांच्या पोस्टरला जोडे मारले. नितेश राणे यांचे पोस्टर गाढवाला बांधून सोडून देत निषेध नोंदवला.
‘बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे’ यांना आता कवडीची किंमत नाही. नितेश राणे यांची मराठा समाजात काय किंमत आहे ते गरजवंत मराठा समाजापुढे एकटे येऊन बघावे, असे थेट आव्हान सांगलीतील मराठा आंदोलकांनी नितेश राणे यांना दिले. यावेळी आमदार नितेश राणें विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संतप्त मराठा समाजाकडून नितेश राणेंच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, सांगलीमधीलच विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलकांनी रावणरुपी पुतळ्याचे दहन केले. मराठा समाजाला विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रामदास कदम यांच्या फोटोला जोडे मारून रावणरूपी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते.