Nanded Hospital | औषधं होती, डॉक्टर होते, मग 24 मृत्यू कसे? वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काय सांगितलं?
Nanded Hospital | नांदेडच्या रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू कसे झाले? यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे. हाफकीन आता औषध खरेदी करत नाही, मग आता कोणाकडून औषध खरेदी सुरु आहे?

नांदेड (अक्षय मंकणी) : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. ही अशी घटना पहिल्यांदा घडलेली नाही. याआधी कळ्व्यातील एका रुग्णालयात एकारात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये सुरु झालेलं हे लोण आता मराठवाड्यापर्यंत पोहोचल आहे. तिथे घाटी रुग्णालायत 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झालाय. सरकारी रुग्णालयात इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्णांचा मृत्यू होणं ही गंभीर बाब आहे. यावर आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व्यक्त झाले आहेत. ” नांदेडच्या रुग्णालायतील घटना दुर्देवी आहे. अशा घटना घडायला नकोत. अधिकाऱ्यांकडून कळलं की, 48 तासात आलेले 4-5 पेशंट होते” असं हसन मुश्रीफ म्हणाले.
“अपघातानंतर रुग्णाला सरकारी रुग्णालयात आणलं जातं. खासगी हॉस्पिटलमध्ये नेत नाही. खासगी रुग्णालयात उपचार घेताना बिल भरण्यासारखी परिस्थिती नसेल, तर त्यांना सरकारी रुग्णालयात आणलं जातं. नेमकं काय घडलं? त्याची चौकशी होईल. अधिकारी पुढे गेलेत, मी सुद्धा जाणार आहे” असं हसन मुश्रीफ म्हणाले. “नांदेडच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा नव्हता, मनुष्यबळ होतं, डॉक्टर होते, प्रत्येक मृत्यूची चौकशी होईल” असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हाफकीन संस्थेकडून औषध खरेदीचा निर्णय झाला होता, महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर निर्णय बदलण्यात आल्याच बोललं जातं, असा प्रश्न मुश्रीफ यांना विचारला. औषध खरेदीसाठी आता पैसे कोण देतो?
“हाफकीनकडून अनेक दिवसांपासून औषध आणि वैद्यकीय उपकरणांची खरेदी होत नव्हती. त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे 800 कोटी रुपये परत केले होते. महायुती सरकारने प्राधिकरणाची व्यवस्था केली. आता जिल्हा नियोजन मंडळाकडून पैसे दिले जातात. हाफकीनची गरज नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. कोणाकडून हलगर्जीपणा झाला असेल, तर कारवाई होईल” असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. प्राधिकरण वैद्यकीय शिक्षण खात्यांतर्गत येत की, औषध अन्नपुरवठा खात्यात येतं, या प्रश्नावर ते म्हणाले की, “मी या विभागाचा मंत्री होण्यापूर्वी प्राधिकरण झालय. मुख्यमंत्री या प्राधिकरणाचे अध्यक्ष असून आम्ही खात्याचे मंत्री सदस्य आहोत”