उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, मुख्यमंत्री म्हणायचे की गुंड मंत्री ? आता नवीन ‘गुंड’ खाते तयार करा
गृहमंत्र्याला पदावर रहाण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही आलं तर लगेच बाजूच्या राज्यात जाऊन अटक केली जाते. मग इथे दुसरा न्याय का ? फडणवीस यांच्यात हिंमत नाही. एकूणच गुंडागर्दीचे राज्य सुरु आहे.
ठाणे : युवासेनेच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्यात जबर जखमी झालेल्या रोशनी शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्पितळात जाऊन भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसेच, अत्यंत लाचार लाळगोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण, त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला तरीसुद्धा कुठेही हलायला तयार नाही अशी टीका केली आहे.
मिंधे गटाची गुंडगिरी वाढत चालली आहे. ठाण्यामध्ये पत्रकाराला धमकी देण्यात आली होती. पत्रकाराला धमक्या दिल्या जातात. महिलांना मारहाण केली जाते. अशी मारहाण होत असेल तर गृहमंत्र्याला पदावर रहाण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही आलं तर लगेच बाजूच्या राज्यात जाऊन अटक केली जाते. मग इथे दुसरा न्याय का ? असा सवाल त्यांनी केला.
फडणवीस यांच्यात हिंमत नाही. एकूणच गुंडागर्दीचे राज्य सुरु आहे. आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं की गुंड मंत्री म्हणायचं असे मी नाही म्हणत. पण, असे म्हणायचे की नाही हे लोक ठरवतील. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना असे आणखी एक खात निर्माण करावं. गुंड मंत्री असे खाते निर्माण करून गुंड पोहचण्याच काम त्या मंत्र्याकडे द्यावं.
शिवसैनिक नपुसंक नाही…
आमचे शिवसैनिक शांत राहिले याचा अर्थ शिवसैनिक तुमच्यासारखे जे सर्वोच्च न्यायालय म्हणते तसे नपुसंक नाहीत. जर मनात आणलं तर आता या क्षणाला ठाण्यातून यांना मुळासकट उखडून टाकण्याची हिंमत जिद्द दाखवणारे आमचे शिवसैनिक आहेत.
गृहमंत्री राजीनामा द्या, बिन कामाचा आयुक्त याची बदली करा
गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि बिनकामाचा आयुक्त जो आयुक्त आहे. केवळ पदासाठी जर का ते लाचारी करणार असतील तर त्या आयुक्तांना सुद्धा मला सांगायचे की तुम्ही पदभार स्वीकारताना जी शपथ घेतली. त्या शपथेची ती प्रतारणा नाही का ? हा बिन कामाचा आयुक्त निलंबित करा किंवा बदली करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.