राज्यात आता गो… गो… गो… गोविंदा…, स्पर्धेत उतरा 11 लाखांचे बक्षिस जिंका, कुणी केली घोषणा?
गोविंदाला अपघात होऊ नये यासाठी दहीहंडी समन्वय समितींना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार समन्वय समिती नियमावली तयार करणार आहे. यानुसार प्रत्येक स्पर्धकाची काळजी घेतली जाईल. प्रत्येकाला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा कवच देण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातील 50 हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे. मुंबईतील 20 गोविंदा पथकांतील सुमारे तीन हजार 500 गोविंदांना विम्याचा लाभ होणार आहे अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रो-गोविंदा स्पर्धा होणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. यावेळी राज्याचे युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्यासह महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर, दहीहंडी समन्वय समितीचे पूर्वेश सरनाईक उपस्थित होते. वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी ही स्पर्धा होणार आहे.
दहीहंडी ही पारंपरिक स्पर्धा आहे. मात्र, त्याचे रूपांतर आता उत्सवात झाले. या स्पर्धेमधून राज्याचा नावलौकिक वाढविणारे दर्जेदार खेळाडू तयार होतील, असे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले. राज्यात मोठ्या उत्साहात या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच, या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यावर भर राहील असेही त्यांनी सांगितले.
वरळी भागातील इनडोअर स्टेडियची उंची 40 फूट आहे. त्यामुळे तिथे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ऑलिंपिकच्या धर्तीवर येथे मॅटचा वापर करण्यात येणार आहे. तर, गोविंदाचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास 10 लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
असे असेल बक्षिस
गोविंदा खेळाडूंचे कार्यक्रम, स्पर्धा वर्षभर घेण्यात ह्येणार आहेत. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. प्रो गोविंदा स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा विजेत्या संघाला पहिले बक्षिस 11 लाख रूपये, दुसरे बक्षिस 7 लाख रूपये, तिसरे बक्षिस 5 लाख रूपये आणि चौथे बक्षिस 3 लाख रूपये ठेवण्यात आले आहे. तर, महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे.