ऐन उन्हाळ्यात जळगाव पाणी प्रश्न पेटला, गुलाबराव पाटील यांच्या विरोधात महिला आक्रमक, नेमकं काय घडलं?
पानी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात पाण्याचा प्रश्न तापला आहे. महिला आक्रमक झालेल्या असतांना राजकीय वातावरण देखील पाण्याच्या मुद्द्यावरून तापले आहे.
जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात पाणी प्रश्न पेटला असून महिलांनी पाण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. ऐन उन्हाळ्यात 20 ते 22 दिवस उलटून देखील नळांना पिण्याचे पाणी येत नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे विनंती करून देखील पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी दुपारी थेट नगरपालिकेवर धडक दिली.
आक्रमक झालेल्या महिलांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी न भेटल्याने महिलांना संताप अनावर झाला होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील नगरपालिकेत दाखल झाले होते. त्यामुळे अधिकच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आठवडाभरात धरणगाव शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यामध्ये गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गावातील महिलांसह ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही आक्रमक झाल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
राज्यात ज्यांच्यावर संपूर्ण पाण्याची ज्यांची जबाबदारी आहे. त्याच पाणीपुरवठा मंत्र्यांच्या मतदार संघात पाण्याचा प्रश्न पेटला आहे. त्यामुळे राज्यातील पाण्याची काय स्थिती असेल असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न गुलाबराव पाटील कधी आणि कसा सोडवतात याची चर्चा सुरू झाली आहे.
गुलाबराव पाटील यांच्याकडे राज्यातील पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी आहे. त्यामध्ये राज्यातील दुष्काळी भागसह ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आहे. राज्यात पाण्याची परिस्थिती पाहता पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता असतांना पाणी पुरवठा मंत्र्यांच्या मतदार संघातच पाण्याचा प्रश्न वाढला आहे.
जळगाव जिल्ह्याची जबाबदार ज्यांच्या खांद्यावर सध्या आहे त्याच गुलाबराव पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाण्याचा प्रश्न अधिक बिकट झाला असून गुलाबराव पाटील यांच्या विरोधात महिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पालिकेतही महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
धडक मोर्चा काढून महिलांनी गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्याधिकारी यांना इशारा दिला आहे. संताप व्यक्त करत महिलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात तापला असून त्याच्या आडून राजकारण देखील तापणार आहे.