‘बैसरन घाटीमध्ये गोळीबाराचा आवाज आला अन् सव्वा तास दगडाचा मागे लपले…’, पर्यटकांनी सांगितला पहलगाम हल्ल्याचा थरारक अनुभव
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर आणि कटरा परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका बाजूला हल्ल्याची भीती, दुसऱ्या बाजूला बंद झालेली वाहतूक व्यवस्था आणि तिकीटांच्या अभावामुळे पर्यटकांची मोठी फरफट झाली.

जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 26 जणांना प्राण गमवावे लागले. हल्ल्याप्रसंगी जळगाव येथील नेहा वाघुळदे आणि रेणुका भोगे मैत्रिणीसह बैसरन घाटीमध्ये होत्या. त्या ठिकाणी जे घडले ते त्यांनी पाहिले. बैसरन घाटीमध्ये त्यांना गोळीबाराचा आवाज आला अन् मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. आम्ही दुसरीकडे तब्बल सव्वा तास एका मोठ्या दगडाच्या मागे लपून होतो. एकमेकांना धीर देत होतो, अशा थरारक आठवणी नेहा वाघुळदे यांनी सांगितल्या.
जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या जळगावातील पर्यटक नेहा वाघुळदे, रेणुका भोगे या जळगावात सुखरूप परतल्या आहेत. ज्यावेळी हल्ला त्यावेळी नेहा वाघुळदे बैसरन घाटीमध्ये होत्या. सोबत रेणुका भोगे होत्या. प्रत्यक्षात त्यांनी त्या ठिकाणचा दहशतवादी हल्ल्याचा थरार अनुभवला. त्यांनी सांगितले की, आजपर्यंत वाचलेले होते. टीव्हीवर बघितलेले होते. मात्र, प्रत्यक्षात थरार काय असतो, हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले. ते शब्दांत सांगणे अशक्य आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात काही पर्यटक मारले गेल्याचे कळले. त्यावेळी मनात मोठी धडकी भरली. भिती निर्माण झाली. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी आम्हाला सुरक्षितस्थळी नेले. ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला त्यांच्या आठवण आजही डोळ्यासमोर आहे. ज्याप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच फिरण्याचा आनंद विसरणार नाही, त्याच पद्धतीने आयुष्यात या ठिकाणचा प्रत्यक्ष अनुभवलेला थरार सुद्धा विसरणार नाही, असे नेहा वाघुळदे आणि रेणुका भोगे यांनी सांगितले.
कल्याणच्या म्हात्रे कुटुंबियांना मिळाली मदत
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर आणि कटरा परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका बाजूला हल्ल्याची भीती, दुसऱ्या बाजूला बंद झालेली वाहतूक व्यवस्था आणि तिकीटांच्या अभावामुळे पर्यटकांची मोठी फरफट झाली. अडचणीत अडकलेल्या कल्याणच्या म्हात्रे कुटुंबाला आमदार सुलभा गायकवाड यांनी केलेल्या तातडीच्या मदतीमुळे वंदे भारत एक्सप्रेसने दिल्लीमार्गे कल्याणमध्ये सुखरूप आणण्यात आले. कल्याणमध्ये पोहोचल्यावर कुटुंबाने त्या भयावह अनुभवाची माहिती दिली आणि आमदारांचे मनःपूर्वक आभार मानले.
कल्याण पूर्वेतील भोसरी गावातील म्हात्रेपाडा येथे राहणारे पिंटू म्हात्रे व त्यांचा भाऊ निलेश म्हात्रे आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते. २२ एप्रिल रोजी त्यांनी कटरा येथे वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आणि पुढे काश्मीरकडे जाण्याचा विचार केला होता. मात्र याच दिवशी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समजताच त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यामुळे २३ एप्रिल रोजी कटरा शहर बंद करण्यात आले. एकीकडे बाहेर बंदची परिस्थिती, दुसरीकडे त्यांना घेऊन आलेले बस देखील फोडण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यातच त्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाल्याने सर्वांनीच त्यांना हॉटेलमध्येच थांबण्याचा सल्ला दिला. सर्वांसमोर या परिस्थितीत घरी परतायचे तरी कसे, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. रेल्वे स्टेशनवर तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केला असता स्टेशनवर अफाट गर्दी होती. त्यात तिकीट मिळत नसल्याने कुटुंबातील १३ सदस्य त्यात लहान मुलांना घेऊन जायचे कसे ही चिंता आणखीनच वाढली. या भीतीच्या छायेखाली असताना म्हात्रे यांनी तात्काळ कल्याणच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. आमदार गायकवाड यांनीही परिस्थितीची गंभीरता ओळखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क साधला आणि तातडीने रेल्वे तिकिटांची सोय करून दिली. अखेर २५ एप्रिल रोजी म्हात्रे कुटुंबाला वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट मिळाले. त्यांनी कटऱ्याहून दिल्ली आणि नंतर दिल्लीहून कल्याणचा प्रवास केला. कल्याणमध्ये पोहोचल्यावर म्हात्रे कुटुंबाने आमदार सुलभा गायकवाड यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानले.