मंत्र्यांची झाडाझडती, टीव्ही 9 मराठीचा दणका, 24 तासांत 26 जणांना अटक, 27 गुन्हे दाखल
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हातभट्टींवर का कारवाई केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित करत मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. याबाबत 'टीव्ही 9 मराठी'ने वृत्त प्रदर्शित केलं होतं. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या 24 तासात धडाकेबाज कारवाई केली आहे.
जळगाव | 27 जुलै 2023 : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जळगाव जिल्ह्यातील अवैध गावठी दारू विक्रीसंदर्भात आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांसह गिरीश महाजन यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. मंत्र्यांनी आगपाखड केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईची उशिरा जाग आलीय. गेल्या 24 तासात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे टाकून 27 गुन्हे नोंदवले असून 26 आरोपींना अटक केलीय.
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला होता. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण हे देखील उपस्थित होते. या बैठकीत मंगेश चव्हाण यांनी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांची तक्रार केली होती. अवैधपणे बनावट दारु विकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. उलट काही अधिकाऱ्यांकडून हप्ता घेतला जातो. त्यामुळे आरोपी हे आणखी फोफावत असल्याची तक्रार मंगेश चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी भर बैठकीत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं होतं.
26 जणांना अटक, 27 गुन्हे दाखल
संबंधित बैठक पार पडल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ने याबाबतचं वृत्त प्रदर्शित केलं होतं. या बातमीनंतर वरिष्ठ पातळीवर हालचाली घडल्यानंतर त्यानंतर 24 तासात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. यातून 26 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच 27 गुन्हे दाखल करण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांनी यासंदर्भात माहिती दिली. एप्रिल महिन्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात गावठी दारू विक्रीचे 607 गुन्हे दाखल करून साडेतीन लाख लीटर गावठी दारू जप्त केल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, जिल्हाभरात हायवे आणि रस्त्यावर असलेल्या ज्या हॉटेल्स, ढाब्यावर अवैध दारू विक्री केली जात असेल, अशा ठिकाणी कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय.