Jalgaon Shivsainik : गुलाबराव पाटलांनी जनतेची माफी मागावी, जळगावातले शिवसैनिक आक्रमक; महापुरुषांच्या पुतळ्याचं केलं शुद्धीकरण
गुलाबराव पाटील गद्दार आहेत. अशा बेईमान आणि संविधान पायदळी तुडवणाऱ्यांचा निषेध असो, असे म्हणत शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
जळगाव : शिवसेनेसोबत बंडखोरी करणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संविधानाची पायमल्ली केली आहे. त्यामुळे त्यांना महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी जनतेची माफी मागायला हवी, अशा संतप्त भावना जळगावातील शिवसैनिकांनी (Jalgaon Shivsainik) व्यक्त केल्या आहेत. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी भव्य कार रॅली काढून आपल्या धरणगाव मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत पुष्पहार अर्पण केले होते. तसेच शिवसेना आणि आपल्या विरोधकांना टोलेही लगावले होते. आज धरणगावातील निष्ठावान शिवसैनिकांनी या गोष्टीला आक्षेप घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करत त्यांचे शुद्धीकरण (Purification) केले.
जोरदार घोषणाबाजी
जळगावात शिवसैनिक गुलाबराव पाटलांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. गुलाबराव पाटील काल जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला हजर होते. या शक्तीप्रदर्शनानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला होता. याचवरून येथील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. गुलाबराव पाटील गद्दार आहेत. अशा बेईमान आणि संविधान पायदळी तुडवणाऱ्यांचा निषेध असो, असे म्हणत शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
टीका नाही मात्र विरोधकांना लगावला होता टोला
आपल्या स्वागताला आलेली गर्दी ही जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत, असे काल गुलाबराव पाटील म्हणाले होते. मंत्री झाल्यावर पहिल्यांदा आलो आहे. गेली अनेक वर्षे लोकांची कामे केली. आज कोणावर काही बोलणार नाही. कोणाला उत्तर आज देण्याचा विषय नाही. जनता माझ्यासोबत आहे. गुलाबराव संपला म्हणणाऱ्यांनी हे पाहावे, असा टोला काल त्यांनी शिवसैनिकांना लगावला होता. यावरून आता आगामी काळात गुलाबराव आणि शिवसैनिक यांच्यातील संघर्ष वाढणार असल्याचे दिसत आहे.