‘खडसे दरवाजा ठोकून ठोकून थकले, साहेब, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा’, माजी आमदाराची शरद पवारांकडे मागणी
"अशा लोकांपासून साहेब, यापुढे तुम्ही सावध राहा. ज्या लोकांनी तुमच्यासोबत गद्दारी केली आहे त्या लोकांचा बदला आम्ही घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत", अशा शब्दांत माजी आमदार संतोष चौधरी यांनी शरद पवार यांच्यासमोर भाषणातून एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची आज जळगावच्या भुसावळ येथे पार पडली. या सभेला पक्षाचे प्रमुख शरद पवार स्वत: उपस्थित होते. या सभेत माजी आमदार संतोष चौधरी यांनी एकनाथ खडसे यांची हकालपट्टी करून टाका, अशी मागणी शरद पवार यांच्यासमोर केली. “खडसे दरवाजा ठोकून ठोकून थकले. मात्र भाजप त्यांना घेत नाही. साहेब, आपली आमदारकी वाया गेली. यांची दिल्लीला जायला तब्येत खराब नसते आणि मीटिंग घ्यायला तब्येत खराब असते. सुनेला तिकीट मिळाल्यानंतर कशी तब्येत खराब होत नाही?” अशी टीका संतोष चौधरी यांनी केली आहे.
“ते ज्या ज्या ठिकाणी फिरताहेत त्या ठिकाणी त्यांच्या सोबत 100 लोक सुद्धा फिरत नाही. एकनाथ खडसे यांना भाजपने व्यासपीठावर यायला सांगितले आहे. फक्त चोरून चोरून सभा घ्यायला सांगितलं आहे. एकनाथ खडसे यांचा विषय संपवून टाका. स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार नाहीत. माझ्यासारखा स्वाभिमानी कार्यकर्ता असला तर आमदारकीचा राजीनामा देऊन टाकला असता. मात्र थोडीफार पण लाज वाटत नाही”, असा घणाघात संतोष चौधरी यांनी केला.
‘साहेब, यापुढे तुम्ही सावध राहा’
“अशा लोकांपासून साहेब, यापुढे तुम्ही सावध राहा. ज्या लोकांनी तुमच्यासोबत गद्दारी केली आहे त्या लोकांचा बदला आम्ही घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत”, अशा शब्दांत माजी आमदार संतोष चौधरी यांनी शरद पवार यांच्यासमोर भाषणातून एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केला.
एकनाथ खडसे भाजपात जाणार
एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात जाणार आहेत. स्वत: एकनाथ खडसे यांनी याबाबतचं वृत्त दिलं आहे. पण तरीही एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रखडला आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाकडे राज्याचं लक्ष आहे. दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन हे अजूनही खडसेंवर निशाणा साधत आहेत. एकनाथ खडसे भाजपात असताना, गिरीश महाजन आणि खडसे यांच्यात शीतयुद्ध रंगलेलं असायचं. नंतर खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर दोन्ही नेते एकमेकांवर उघडपणे टीका करु लागले होते. दोन्ही नेत्यांमधील हा संघर्ष अजूनही सुरुच आहे.