भाजपात पुन्हा घरवापसी करणार? एकनाथ खडसे म्हणतात….
एकनाथ खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना अचानक उधाण आलं. त्यामुळे खडसे खरंच भाजपात जातात का? हे पाहणं महत्त्वाचं होतं. या दरम्यान खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
जळगाव : भाजप नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात येण्याची साद घालणारं वक्तव्य केलेलं. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने खडसे यांनी पंकजा यांची भेट घेतली. तर दुसरीकडे विनोद तावडे यांनी खडसे यांना पुन्हा भाजपात येण्याचं आवाहन करणारं वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकनाथ खडसे परत भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. अखेर या चर्चांवर खडसे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे.
“भाजप नेते विनोद तावडे आणि आम्ही गेले अनेक वर्षे सोबत काम करत होतो. भाजपमध्ये विनोद तावडेंचे योगदान खूप आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना वाटत असावे की जुन्या लोकांनी पक्षात यावे. कर्नाटकचा पराभवावरून त्यांना असे वाटले असावे की जुन्या नेत्यांनी पक्षात परत यावे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
‘अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मला…’
“ज्या पक्षासाठी इतके केले. 2014 पासून माझा ज्या पक्षात छळ झाला. अनेक चौकशी लावण्यात आल्या त्या पक्षात आता मी पुन्हा जाणं शक्य नाही. असं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय. भाजप मध्ये ज्यांच्यावर मोठे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पक्षात येऊन स्वच्छ झाले. अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मला विधानपरिषद च सदस्य बनवून राजकीय विजन वासातून मला बाहेर काढले. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न नाही”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
‘चौकशांनंतर अजूनही छळ सुरु’
“मी कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नाही. ज्या भारतीय जनता पक्षात असताना मला 2014 पासून जो त्रास झाला, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, एसीबी, एटीएस, लोकायुक्त अशा वेगवेगळ्या माध्यमातून चौकशा झाल्या. त्या चौकशांनंतर अजूनही छळ सुरु आहे. मी तर सर्वच चौकशांमध्ये निर्दोष सुटलो”, असं खडसे एकनाथ यांनी सांगितलं.
“माझा जावाई आजही गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. काही कारण नाही. त्यांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. पण कुठल्यातरी खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न झाला. अशा स्वरुपाचे आरोप आम्ही अनेकांवर केले होते. हजारो कोटींचे आरोप आम्ही सुद्धा केले होते. ते आता भारतीय जनता पक्षात येऊन स्वच्छ झाले आहेत”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
“माझ्या अडचणीच्या कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे या नेत्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊन विधान परिषदेचं सदस्यत्व दिलं. अशा स्थितीत भाजपमध्ये जाण्याचा विचार माझ्या मनात येणार नाही”, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली.