BREAKING | महाविकास आघाडीत चाललंय काय? आता एकनाथ खडसे यांचं वेगळं विधान
महाविकास आघाडीत विशेषत: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमधील मतभेद आता वारंवार समोर येताना दिसत आहेत. ईव्हीएम मशीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री आणि इतर मुद्द्यांवरुन मविआत मतभेद समोर आलेली असताना आता आमदार एकनाथ खडसे यांनी वेगळं विधान करत भाजप नेत्याचं समर्थन केलं आहे.
खेमचंद कुमावत, Tv9 मराठी, जळगाव : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) नेमकं काय सुरुय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या जेपीसी चौकशीची मागणी आणि निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर यावरुन महाविकास आघाडीत मतभेद सुरु असल्याचं बघायला मिळालं. मोदींच्या डिग्रीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतली. मोदींच्या डिग्री विषयी चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीने म्हटलं. तर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची डिग्री खरी असली पाहिजे, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीपेक्षा कोर्टाच्या समितीकडूनच चौकशी व्हावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.
दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेस गौतमी अदानी यांच्या जेपीसी चौकशीवर ठाम आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सुद्धा महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. तर दुसरीकडे आज चंद्रकांत पाटील यांचं बाबरी मशिदबाबत मोठं विधान समोर आलं. त्यांच्या त्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केलीय. पण चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी समर्थन केलं आहे.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिद पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हते, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी समर्थन केलं आहे. बाबरी मशिदबाबत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत असल्याचं म्हणत एकनाथ खडसेंकडून चंद्रकांत पाटलांची पाठराखण करण्यात आली आहे. राम जन्मभूमी आंदोलनात शिवसैनिकांचा कमी संख्येत सहभाग होता, असं स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी मांडलं आहे.
“राम जन्मभूमी आंदोलनात किती शिवसैनिक होते हा विचार करण्यासारखा विषय आहे. बाबरीचा ढाचा आम्ही पाडला हे म्हणण्याचं धैर्य भाजपमध्ये नव्हतं. होय, बाबरी मशिद शिवसैनिकांनी पाडली अशी प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरेंनी दिली. बाबरी मशिदच्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो. या प्रकरणात पंधरा दिवस तुरुंगवासासह पोलिसांकडून मला मारहाण झाली. त्यावेळी शिवसेनेचे जे मंत्री आले ते सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी आले”, असं मोठं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं.
उद्धव ठाकरे यांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. “गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. असे बाबरीच्या खंदकातून उंदीर बाहेर पडायला लागले आहे. पण त्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी सगळे उंदीरच बिळात लपलेले होते. कोणताही उंदीर बिळातून बाहेर आलेला नव्हता. त्यावेळी आत्ताचे पंतप्रधान बांग्लादेशच्या लढ्यात किंवा हिमालयात असतील पण त्यांचे नाव मला कुठं आढळून आलेले नव्हते”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.