आर. ओ. तात्या पाटील यांचे अधुरे राहिलेले हे स्वप्न पूर्ण होतेय, मुलगी वैशाली पाटील यांचे अतिशय भावनिक भाषण
आज तात्यासाहेब जिथे कुठे असतील उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आणि प्रयोगशाळेचं उद्घाटन पाहून प्रचंड आनंद झाला असेल.
जळगाव : येथे उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. शिवसेनेच्या सभेला मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी आहे. या सभेत बोलताना आर. ओ. तात्या पाटील यांची मुलगी वैशाली पाटील यांनी भावनिक भाषण दिले. त्या म्हणाल्या, आज माझ्या मनात आनंद आणि वेदना अशा स्वरुपाचा संमिश्र दिवस आहे. आज तात्यासाहेब नाहीत. तात्यासाहेब नसताना उद्धव ठाकरे यांची सभा आहे. आनंद यासाठी की आज माझे वडील तात्यासाहेब यांचं स्वप्न पूर्ण होतंय.
तात्यांची इच्छा पूर्ण झाली
वैशाली पाटील म्हणाल्या, तात्यांनी भव्य प्रयोगशाळा उभी केली. या प्रयोगशाळेचं उद्घाटन फक्त उद्धव ठाकरेंच्या हस्ते व्हावं, अशी तात्यांची मनस्वी इच्छा होती. पण त्यांचं निधन झालं. त्यामुळे स्वप्न अधुरं राहीलं होतं. पण आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं. तात्यांची इच्छा आज पूर्ण झाली, असं वैशाली पाटील यांनी सांगितलं.
तात्यासाहेब निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जगले. आज तात्यासाहेब जिथे कुठे असतील उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आणि प्रयोगशाळेचं उद्घाटन पाहून प्रचंड आनंद झाला असेल. आज उद्धव ठाकरे यांनी तात्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारे तात्या आज प्रत्यक्ष बोलत होते असं वाटत होतं. जशी दोघांची भेट व्हायची तशी उद्धव साहेब आणि त्यांची भेट झाली.
जे गेले ते जाऊद्या
तात्यांनी उद्धव साहेबांना कोणता मूक संवाद साधला असेल तो असा होता की, उद्धव साहेब तुम्ही घाबरु नका, मी देहाने जरी नसलो तरी माझं रक्त, माझी लेक आणि आपले निष्ठावंत शिवसैनिक आपल्या पाठिशी आहेत. जे गेले ते जाऊद्यात. ते सर्व इतिहासाचे जीर्ण पाने आहेत. नवा इतिहास घडवणारे समोर बसले आहेत.
हे सर्व शिवसैनिक फक्त आणि फक्त तुमचे आहेत साहेब. हे शिवैसिनक उद्याच्या युद्धाचे मशाली आहेत. उद्याचा सूर्यादय आपलाच आहे साहेब, लवकरच भगवी पहाट उगवल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या वडिलांचे तात्यांचे शब्द आज त्यांच्या मूकसंवादातून जाणवले. हे सगळं मी अनुभवलं असल्याचं वैशाली पाटील यांनी म्हंटलं.