किशोर पाटील यांना स्थानिक पत्रकाराची बातमी झोंबली, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ
लोकप्रतिनिधींकडे आपण आशेने पाहतो. त्यांनी संयमाने परिस्थिती सांभाळावी, अशी आशा असते. पण काही जण या गोष्टीला अपवाद असतात. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे त्यापैकीच एक. त्यांनी एका पत्रकाराला अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलीय. विशेष म्हणजे व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप आपलीच असून आपण शब्द मागे घेणार नाही, असं ते कॅमेऱ्यासमोर म्हणत आहेत.
जळगाव | 5 ऑगस्ट 2023 : पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होतेय. या ऑडिओ क्लिपमध्ये किशोर पाटील एका स्थानिक पत्रकाराला शिवीगाळ करताना ऐकायला मिळत आहे. तसेच घरी येऊन मारहाण करु, अशी धमकी देखील या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतेय. जळगाव जिल्हा सध्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन हादरला आहे. या प्रकरणावरुन एका स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. ही टीका किशोर पाटील यांना झोंबली. या टीकेच्या रागातून किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित पत्रकाराने केला आहे.
ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर किशोर पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. “होय, मी शिव्या दिल्या. पत्रकाराला शिव्या दिल्याचा मला अभिमान आहे. समोर आलेली ऑडिओ क्लिप माझीच आहे. मी मान्य करतो. मी माझे शब्द मागे घेणार नाही”, असा पवित्रा किशोर पाटील यांनी घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेवर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
किशोर पाटील नेमकं काय म्हणाले?
“निश्चितपणे ती ऑडिओ क्लिप माझीच आहे, हे सांगताना मला दु:ख होत नाही. याचं कारणही तसंच आहे. गरीब कुटुंबाच, ज्यांचं इतकं मोठं नुकसान झालंय, आमची सात वर्षाची चिमुकली गेलीय, तिच्या आई-वडिलांच्या सांत्वन करावं म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, अंतिम आठवडा प्रस्ताव असताना, प्रचंड धावपळ असताना, त्या आई-वडिलांच्या सांत्वनासाठी एखादा 12 कोटी जनतेचा नेतृत्व करणारा मुख्यमंत्री किती संवेदनशील आहे याचं उहादरण बघायला मिळालं”, असं किशोर पाटील म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय बाजूला काढून त्या आई-वडिलांशी तब्बल चार मिनिटे सांत्वन केलं. त्यांना सांगितलं की, माझी मुलगी आहे, असं समजून मी या प्रकरणावर कारवाई करेन. असं असताना एखादा पत्रकार, तोही विकृत होता का ते मला माहिती नाही. असा एखादा पत्रकार मुख्यमंत्र्यांची चमकूगिरी असं संबोधतो. इतकी संवेदनशील घटना असताना, मुख्यमंत्री चमकूगिरी करतात, अशाप्रकारची बातमी करु शकतो?”, असा सवाल त्यांनी केला.
“ज्याला जशी भाषा कळते, त्याच भाषेत उत्तर देण्याचा अभ्यास आम्ही बाळासाहेबांकडून घेतलेला आहे. त्यामुळे ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेचा मी वापर केलेला आहे. मी ते मागे घेणार नाही. होय, मीच शिव्या दिलेल्या आहेत”, असं किशोर पाटील म्हणाले.
किशोर पाटील यांची वागणूक योग्य की अयोग्य? चर्चांना उधाण
किशोर पाटील हे संबंधित पत्रकाराला शांततेत सुद्धा समजवू शकले असते किंवा रागाने ओरडले असते. समज दिली असती, पण समोरच्या व्यक्तीच्या आई आणि बहिणीवरुन इतक्या अर्वाच्य भाषेत बोलणं हे एका लोकप्रतिनिधीला शोभणारं नाही, अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य माणसं देव मानतात. त्यांच्याकडे खूप आशेने पाहतात. पण अशी माणसंच अशाप्रकारे वागायला लागली तर ते योग्य नाही, अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे.