संजय राऊत जळगावात दाखल होताच राडा, गुलाबराव पाटील यांच्या महिला ब्रिगेड रस्त्यावर
संजय राऊत आज जळगावात दाखल झाले आहेत. त्यांचंं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. पण दुसरीकडे गुलाबराव पाटील यांच्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या. त्यांनी संजय राऊत यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.
जळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात येत्या रविवारी सभा आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज जळगावात दाखल झाले आहेत. संजय राऊत आज जळगाव रेल्वे स्थानकावर आले तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते तिथे संजय राऊत यांच्या स्वागतासाठी आले होते. पण त्यानंतर जळगावातील वातावरण तापताना दिसतंय. शिवसेनेचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले. त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.पण त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं बघायला मिळालं.
“संजय राऊत यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय”, अशा घोषणाबाजी महिला कार्यकर्त्यांनी यावेळी केल्या. “शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक हा गुलाबराव पाटील आहे हे लक्षात ठेवायचं. हेच संजय राऊत यांना आम्हाला सांगायचं आहे. आमच्या गावात येऊन आमच्याच पालकमंत्र्यांना तुम्ही चॅलेंज करतात? शिवसेना सर्वसाधारण लोकांची आहे. इथला प्रत्येक शिवसैनिक हा मंत्री आहे”, असं आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्या महिला म्हणाल्या.
“आम्ही कफन बांधून फिरु. त्यांची हिंमत असेल तर फक्त आमच्या इतक्या लोकांना त्यांनी भेटून दाखवावं. संजय राऊत यांच्यात दम असेल तर त्यांनी भेटून दाखवावं. आपली लायकी काय आणि बोलतात काय? एवढं संपवलं ना?”, असे खोचक सवाल या महिलांनी यावेळी केले.
या सगळ्या गदारोळावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं. आर ओ तात्या हे आमचे दैवत आहेत. पण राऊतांनी चौकटीत बोलावं. संजय राऊत जास्त बोलत असतील, आमच्या मतावर मातलेला हा बोक्या जास्त उडत असेल तर त्यांनी सावधानतेने राहावं. मी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. एकही शब्द वाकडतिकडं बोलला तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाता जाऊन दाखवावं”, असं चॅलेंज गुलाबराव पाटील यांनी दिलं.
संजय राऊत यांनी जळगावात दाखल झाल्यानंतर जळगावात घुसलो, अशी प्रतिक्रिया दिलीय. त्यांच्या या प्रतिक्रियेवर गुलाबराव पाटलांनी टीका केली. “तुमचा एक माणूस तिथे गेलेला दाखवा. इथे माझे सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक फुटले आहेत. तू काय करु शकतो संजय राऊत? तुमचा एक कार्यकर्ता घुसला तर सर्व बंद करेल असं ते बोलले आहेत. अरे मी 35 वर्षे बाळासाहेबांचा झेंडा घेऊन फिरलेला माणूस आहे. हा राऊत कधी कोणत्या आंदोलनात सहभागी झाला?”, असा सवाल यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला.