रावसाहेब दानवे पराभवाच्या छायेत; जालन्यात काळेंचा दे धक्का, हा अपक्ष उमेदवार ठरला गेम चेंजर
Jalna Lok Sabha Election Results 2024 : जालना मतदारसंघातील घाडमोडी भाजपची डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत. या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रावसाहेब दानवे हे पराभवाच्या छायेत आले आहेत. डॉ. कल्याण काळे यांनी गेल्यावेळी प्रमाणेच त्यांना टफ फाईट दिली आहे.
मराठवाड्यातील बहुचर्चित जालना लोकसभा मतदारसंघात एक्झिट पोलला मतदारांनी ‘चकवा’ देण्याचे ठरवले की काय असे चित्र समोर येत आहे. या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रावसाहेब दानवे पराभवाच्या छायेत आहेत. अर्थात अजून काही फेऱ्या उरलेल्या आहेत. पण इतकी मोठी लीड ते कापतील का? मतदानाचा रथ ओढून ते हा पल्ला कमी करतील का अशी चर्चा राज्यात रंगली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी त्यांना मोठा धक्का दिला आहे. यामध्ये या अपक्ष उमेदवारांची भूमिका पण निर्णायक ठरली आहे. दानवे यांचा पराभव झाला तर हा मराठा आरक्षणाचा पहिला राजकीय बळी ठरेल.
एक्झिट पोलला ‘चकवा’
एक्झिट पोलच्या आकड्यांनी अर्थातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात तराजूत झुकते माप टाकले आहे. पण मराठा आरक्षणाचे समीकरण गणित बिघडवू शकते, असा एक मत प्रवाह पण आहे. या मतदारसंघात 13 मे रोजी मतदान झाले होते. तेव्हापासून मतदार एक्झिट पोलला चकवा देतील अशी चर्चा रंगली आहे. आता मतमोजणीत कल्याण काळे 2683 मतांनी आघाडीवर आले आहेत. तर रावसाहेब दानवे आणखी पिछाडीवर गेले आहेत. अर्थात सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यावर आणि मतमोजणी संपल्यावर कोण कोणाला चकवा देते हे समोर येईल.
मंगेश साबळे यांची मोठी खेळी
जालना हे मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. जालना जिल्ह्यात अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी जोरदार मुसंडी मारली. साबळे हे अपेक्षेप्रमाणे गेमचेंजर ठरले आहेत. त्यांनी दुसऱ्या फेरीपासूनच कमाल दाखवायला सुरुवात केली होती. मध्यंतरी दानवे यांनी मोठे अंतर कापले होते. पण साबळे यांनी मोठी आघाडी घेतली. त्यात दानवे हे पिछाडीवर राहिले.
जालना लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी 1,00,216 मते घेऊन आघाडी टिकवून ठेवली आहे. तर डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा 49,053 मतांची आघाडी घेतली आहे. दानवे यांना 3,14,092 तर कल्याण काळे यांना 3,63,145 मते आहेत.