सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला; संभाजी भिडेही सोबतीला, काय निर्णय होणार?
Sandipan Bhumre Arjun Khotkar Meets Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस, थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधणार; संभाजी भिडेही सोबतीला, निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष,
जालना | 12 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे. मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर हे मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अंतरवाली सराटी गावात जात मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी ते भेट घेत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे देखील आहेत. काल सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत मनोज जरांगे यांच्याशी या नेत्यांनी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. त्यांची प्रकृती रात्रीपासून खालावली आहे. त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. त्यानंतर आता आज सरकारचं शिष्ठमंडळ जरांगे यांच्या भेटीला पोहोचलं आहे. यावेळी तब्येतीला सांभाळा. उपोषण मागे घ्या, अशी विनंती यावेळी करण्यात आली. संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांच्यासोबतच संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मी थोड्या वेळात माध्यमांशी बोलेन. तेव्हा माझी भूमिका स्पष्ट करतो, असं जरांगे म्हणाले.
तुमचा लढा सुरुच ठेवा. पण उपोषण मागे घ्या. आपण लढा देत राहू. आरक्षण घेतल्याशिवा. शांत बसायचं नाही. मात्र सध्या उपोषण मागे घ्या. आपण पुढची लढाई लढत राहू, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं. पण त्यांच्या या मनधरणीला अद्याप यश आल्याचं दिसत नाही. मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन अद्याप मागे घेतलेलं नाही.
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर जरांगे यांनी अद्याप आपला निर्णय सांगितलेला नाही. त्यामुळे या भेटीनंतर लगेचच अर्जुन खोतकर आणि संदीपान यांची बैठक सुरू झाली आहे. आंदोलन सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनोज जरांगे यांची बाजू पोचवणार आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सुरू झाली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आज दुपारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.