मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग दोन्ही बाजूने अडवला, प्रचंड घडामोडी
जालन्यात आता मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांनी आता धुळे-सोलापूर महामार्ग अडवला आहे. गेल्या एक तासांपासून धुळे-सोलापूर महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला आहे.
विधानसभा निवडणुकीच्याआधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा वातावरण तापताना दिसत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मनोज जरांगे यांची आता प्रकृती ढासळताना दिसत आहे. त्यांची ही परिस्थिती पाहून मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांनी आज अंतरवली सराटी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर वडीगोद्री गावाजवळ धुळे-सोलापूर महामार्ग अडवला आहे. विशेष म्हणजे आंदोलकांमध्ये महिला आणि मुलीदेखील आहेत. जवळपास तासाभरापासून आंदोलकांनी दोन्ही बाजूने मार्ग रोखून धरला आहे. वडीगोद्री येथे मराठा आणि ओबीसी समाजाचे आंदोलक आमनेसामने आल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. यानंतर आता मराठा समाजाचे आंदोलक थेट रस्त्यावर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पोलीस आता परिस्थिती कशी हाताळतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठा आंदोलकांकडून धुळे-सोलापूर महामार्ग अडवण्यात आला आहे. जालन्याच्या वडीगोद्री येथे मराठा आंदोलक रस्त्यावर जमले आहेत. त्यांनी महामार्ग रोखून धरला आहे. वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे दीड किलोमीटर अंतरावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. जरांगे यांच्या उपोषणस्थळापासून अवघ्या दीड किमी अंतरावर मराठा आंदोलक धुळे-सोलापूर महामार्गावर एकत्र आले आहेत.
महिलादेखील उतरल्या रस्त्यावर
धुळे-सोलापूर महामार्गावर महिला देखील रस्त्यावर उतरल्या आहेत. महिलांनी रस्त्यावर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखून धरला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असताना त्यांच्या उपोषणाची शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, शासनाचं कोणतंही शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी वडीगोद्री येथे एकत्र येत धुळे-सोलापूर महामार्ग अडवला आहे.
मनोज जरांगे यांची प्रकृती आज दुपारपासून ढासळली आहे. जवळपास एक तासापासून आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग दोन्ही बाजूने रोखून धरला आहे. विशेष म्हणजे जिथे मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरु आहे तिथून लक्ष्मण हाके यांचं उपोषणस्थळ अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे. गेल्या आठ दिवसांपासून मराठा समाज शांत होता. पण आता महिलाही रस्त्यावर उतरलेल्या बघायला मिळत आहेत. आंदोलकांमध्ये लहान मुलं, बालक, मुली आणि महिलांचा समावेश आहे.