Manoj Jarange Patil | ‘दिल्लीतून खाली हात आलात तर…’, मनोज जरांगे यांनी शिंदे-फडणवीस यांना बजावलं
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी दोन्ही नेत्यांना आरक्षणाचा निर्णय घेऊन येण्याचाच सल्ला दिलाय.
जालना | 25 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीला गेले आहेत. ते आज दुपारी दिल्लीच्या दिशेला रवाना झाले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी अमित शाह यांच्यासोबत मराठा आरक्षणाबाबत निर्माण झालेल्या पेचावर कसा तोडगा काढता येईल? याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डीच्या दौर्यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूीवर आज मराठा आरक्षणाबाबत काही मोठी घोषणा होणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
या सर्व घडामोडींवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर रोखठोक भूमिका मांडली आहे. “दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत चर्चा करावी आणि गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्यावे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘दिल्लीतून खाली हात आलात तर एक तासही वेळ देणार नाही’
“तुम्ही दिल्लीला गेला आहात तर निर्णय घेऊन या. दिल्लीतून खाली हात आलात तर एक तासही वेळ देणार नाही”, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे. “कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा”, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. “येताना निर्णय घेऊन यावा महाराष्ट्र तुमच्या निर्णयाची वाट बघतोय”, असंही मनोज जरांगे म्हणाले.
“मराठा समाजाला आरक्षण कुणीही दिलं तर महाराष्ट्रातील मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घ्यायला तयार आहे. आमचा प्रामाणिकपणा आरक्षणाशी आहे. कारण आमच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं आहे. आम्ही आता माघार घ्यायला तयार नाहीत”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“मराठा समाज मालक आहे. आमचं आंदोलन शांततेत सुरु आहे. शांततेच्या आंदोलनाला आमचं समर्थन आहे. समाजाने घेतलेल्या निर्णयावर मी काही बोलणार नाही. समाज मालक आहे. समाज काहीही करु शकतं”, अशीदेखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.