मनोज जरांगे यांना सरकारचा निर्णय मान्य नाही, देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली सडकून टीका
महाराष्ट्र सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला. निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने सादर केलेल्या अहवालात ज्यांच्या मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण तो निर्णय मनोज जरांगे यांना मान्य नाही. त्यांनी सरकारकडे सरसकट कुणबी आरक्षणाची मागणी केलीय. त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
जालना | 31 ऑक्टोबर 2023 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत रोखठोक भूमिका मांडली. राज्य सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने दिलेला अहवाल स्वीकारला आहे. या अहवालातील 11 हजार 500 नोदींनुसार कुणबी प्रमाणत्र देण्याचा निर्णय घेतलाय. सरकारने 11 हजार 500 जणांच्या वंशजांना मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय मनोज जरांगे यांनी स्वीकारलेला नाही. “मी सकाळी स्पष्ट सांगितलं होतं की, तुम्ही निर्णय घेताना सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावेत म्हणून निर्णय घ्या. माझ्या माहितीप्रमाणे तसा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणारही नाही. संबंधित अधिकाऱ्याने ते वाटूसुद्धा नये. तुम्हाला ते वाटू दिले जाणार नाहीत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“उद्याच्या उद्या सरकारने विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा करुन महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला राज्याचा दर्जा देऊन तोच प्रथम अहवाल तयार करुन त्याच अधारे महाराष्ट्राच्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. जर तुम्ही मराठा आरक्षणाबाबत उद्यापर्यंत ठोस निर्णय घेतला नाही तर उद्या संध्याकाळपासून मी पुन्हा पाणी बंद करणार आहे. या सर्वांना जबाबदार सरकार राहणार”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
‘तुम्ही जाणूनबुजून मराठ्यांवर अन्याय करतायत’
“महाराष्ट्र शांत आहे. सरकारला महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही, असा सरकारचा अंदाज आहे. त्याला आम्ही काही करु शकत नाही. तुम्ही जाणूनबुजून मराठ्यांवर अन्याय करतायत. तुम्हाला आणखी अन्याय करायचा आहे. पण आता आम्ही सहन करु शकत नाहीत. तुम्ही उद्यापर्यंत विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देवून ओबीसीमध्ये सहभागी करुन घेतलं नाही तर उद्यापासून पाणी पिणं होईल, याची सरकारने नोंद घ्यावी”, असं मनोज जरांगे म्हणाले.
‘तुम्ही एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला, तर…’
“बीड जिल्ह्यात संचारबंदी लावली त्यावर आमचं काही म्हणणं नाही. ते कुणी केलं, काय केलं ते माहिती नाही. पण गोरगरिबांच्या लेकरांना तुमचा एसपी आणि कलेक्टर हटवत असतील तर हे प्रकार बंद करा. आंदोलन अगोदर आहे, नंतर तुमची संचारबंदी. अगोदर आम्ही आहोत. त्यामुळे तुमची संचारबंदी तिकडे बाजूला ठेवला. जर तुम्ही एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला, त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी स्वत: इथून उठेन आणि तिथे एसपी आणि कलेक्टरच्या समोर जावून बसेन”, अशा इशारा मनोज जरांगेंनी दिला.
‘यापुढे आम्ही सहन करणार नाहीत’
“मग तिथे 10 लाख मराठे येतील का ते मला माहिती नाही. पण मी तिथे समोर येऊन बसलो तर तुमची खूप फजिती होईल. तुमची संचारबंदी राबवायची ती राबवा. पण माझ्या मराठा बांधवाला त्रास झाला तर सरकारसह संबंधित प्रशासनाला आम्ही गप्प बसू देणार नाही. याला धमकी समजू नका. आम्हाला त्रास देता. मग तुम्हालाही सुट्टी नाही. एकदा तुमच्याकडून झालं. ते आम्ही सहन केलं. पण यापुढे आम्ही सहन करणार नाहीत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
‘आंदोलन मोडायची गरज नव्हती’
“तुम्हाला आज लोकांना उचलायची आणि आंदोलन मोडायची गरज नव्हती. नाहीतर उद्या मी तिकडे येईन. मग तुम्हाला कळेल मराठा काय आहेत. तुमच्या एसपी आणि कलेक्टरला तंबी द्या. बीडमध्ये मराठ्यांचे पुरावे मागितले तर त्यांनी एकही पुरावे नाहीत सांगितले. पण आमच्या अभ्यासकांनी फक्त गेवराईत शोधले तर 10 हजार मिळाले. त्यामुळे इतके जातीय अधिकारी आम्ही पाहिले नाहीत” , अशी टीका मनोज जरांगे म्हणाले.
‘नाहीतर पुढची जबाबदारी सरकारची असेल’
“आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जशास तसं उत्तर देऊ हे मी मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतो. आम्ही शांततेत आंदोलन करत असताना तुम्ही त्रास देणार असाल तर आमचाही नाईलाज आहे. तुम्ही तुमच्या लोकांना आज रात्री तंबी द्या. तुमची संचारबंदी राहू द्या. पण आमच्या आंदोलकांना त्रास देऊ नका. नाहीतर पुढची जबाबदारी सरकारची असेल”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.