दोन दिवसात आरक्षण देतो हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का म्हणत नाहीत?; थरथरत्या आवाजात मनोज जरांगे यांचा सवाल
Manoj Jarange Patil on CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : मागच्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा हा दुसरा टप्पा आहे. आता मनोज जरांगे यांची तब्येत आणखी खालावली, माध्यमांशी बोलताना हातातून माईक खाली पडला.
संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जालना | 29 ऑक्टोबर 2023 : आरक्षण मिळावं, मराठा समाजातील दुर्बल घटकांना लाभ मिळावा, यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा हा तिसरा टप्पा आहे. या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांचा हात थरथरत होता. यावेळी बोलताना त्यांचा आवाजही खालावला होता. थरथरत्या आवाजात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. माध्यमांशी बोलत असतानाच मनोज जरांगे यांना अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून ते झोपून माध्यमांशी बोलत होते. पण त्यावेळीही बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्या हातातून माईक खाली पडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे आरक्षणावर का बोलत नाहीत? दोन दिवसात आरक्षण देतो, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का म्हणत नाहीत?, असा सवाल थरथकत्या आवाजात मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला विचारला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काल बोलताना मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मराठा आरक्षणाचा विषय येत्या 1-2 दिवसात सुटेल, अशी मला आशा आहे, असं तानाजी सावंत म्हणाले. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता मनोज जरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. दोन दिवसात मिळण्याचे संकेत आहेत हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का म्हणत नाहीत? आमच्या लोकांमध्ये यामुळे आनंद निर्माण होईल. आमच्या समाजात तसा मेसेज जाईल, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं, उपोषणं होत आहे. मराठा समाज मोर्चा काढत आहे. काही तरूणांनी आत्महत्या केली आहे. याबाबत मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील तरूणांना आवाहन केलं आहे.
तुम्ही उपोषण करताय त्याचा अर्ज द्या.. परवानगी घ्या.. म्हणजे तुम्ही आमरण उपोषण तातडीने सुरू केलंय हे सरकारला कळू द्या. आपण आरक्षण घेऊ. कोणीही आत्महत्या करू नका. शांततेत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. आपली एकजूट फुटू देऊ नका. आपण आरक्षण मिळवणारच. फक्त एकजूट राहा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.