Manoj Jarange Patil | ‘मी समाजाला शब्द दिलाय, माझी अंतयात्रा तरी निघेल नाहीतर..’; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ गेलं. या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. पण मनोज जरांगे उपोषण सोडायला तयार नाहीत. यावेळी मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळाला स्पष्ट शब्दांत आपली भूमिका सांगितली.
जालना | 5 सप्टेंबर 2023 : राज्य सरकारचं शिष्ठमंडळ आज अंतरवली सराटी गावात उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलं. ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शिवसेना नेते संदिपान भुमरे, अर्जुन खोतकर यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासाठी सरकारने काय-काय पावलं उचलली याबाबत माहिती दिली. मराठा आरक्षणाचं काम 100 टक्के होईल, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
“एकदा जीआर काढून हा प्रश्न सुटणार नाही. समितीशिवाय आपलं काम होणार नाही”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. त्यावर मनोज जरांगे यांनी “तुम्ही म्हणजे सरकार नाही”, असं स्पष्ट सांगितलं. “मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. आंदोलन एवढं ताणून चालत नाही”, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले. तसेच लाठीचार्ज करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्य पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘आम्ही ओबीसींच्या यादीत 83 व्या क्रमांकावर’
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. यावेळी गिरीश महाजन यांनी थोडा वेळ लागेल, असं सांगितलं. “आम्ही सगळे ओबीसीमधून आहोत. पण आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही. आम्ही ओबीसींच्या यादीत 83 व्या क्रमांकावर आहोत”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “ते विनंती घेऊन आले आहेत. तुम्ही वेळ दिला पाहिजे’, असं अर्जुन खोतकर म्हणाले.
“जर 83 व्या क्रमांकावर मराठा आहेत. मग याला चॅलेंज द्यायचं कामच नाही. मंगल समितीने विषय पटलावर ठेवला आहे. तुम्हाला सर्वे करायला मतदान करायचं आहे का? तुमच्याकडे समिती आहे. आम्ही कुणबीच आहोत. आमचा मूळ व्यावसाय शेती आहे. विदर्भ, खान्देश, कोकणात सर्व मराठा बांधलवांना कुणबीचं प्रमाणपत्र दिलं जातं. मग आम्हालाच का नाही? आमचे ओबीसी बांधव हे समजून घेत नाहीयत. दादा तुम्ही आम्हाला हे आरक्षण मिळवून द्या”, असं मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांना म्हटलं.
‘सरकारला 3 महिने वेळ दिला’
“आम्ही सरकारला 3 महिने वेळ दिला. गोर गरिबांचं पोरांचं पाप माझ्या डोक्यावर सोडू नका. आम्हाला 70 वर्षांपासून आरक्षण असून मिळालेलं नाही. माझ्यावर दबाव आणू नका”, असं मनोज जरांगे म्हणाले. यावेळी गिरीश महाजन यांनी वारंवार वेळ वाढवून देण्याची विनंती केली.
‘मी समाजाला शब्द दिलाय, माझी अंतयात्रा तरी निघेल नाहीतर..
“मी मराठा समाजाला शब्द दिलेला आहे. आता शेवटचं माझी अंतयात्रा तरी निघेल नाहीतर मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल. काळाने जगलो तुमचा, मेलो तर समाजाचा. त्यामुळे मी असा मेलेलो परवडेल”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले
गिरीश महाजन – “अहो असं आंदोलन करुन चालत नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले. त्यावर “मी 4 फेब्रुवारीपासून लढतोय”, असं जरांगे पाटील म्हणाले. “मरण्याची भाषा करायची नाही”, असं राजेश टोपे म्हणाले. “अहो, मरायची भाषा करत नाही”, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला आणखी 4 दिवसांचा वेळ देतो, असं आश्वासन दिलं.