शेलार म्हणाले राज्य सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी केलं, आता जयंत पाटलांचा पलवटवार, म्हणाले…
सांगलीमध्ये लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी लसपुरवठ्यामध्ये लक्ष घालावं. त्यांनी केंद्राकडून लस उपलब्ध करून द्यावी, असा टोला जलसंपादमंत्री जयंत पाटील यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांना लगावला.
सांगली : “कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी केंद्र सरकारने जबाबदारी घ्यायला हवी. केंद्राकडून लसी कमी येत आहेत. सांगलीमध्ये लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी लसपुरवठ्यामध्ये लक्ष घालावं. त्यांनी केंद्राकडून लस उपलब्ध करून द्यावी,” असा टोला जलसंपादमंत्री जयंत पाटील यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांना लगावला. सांगली दौऱ्यावर असताना आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रला कोरोनाची राजधानी करून टाकलं आहे, असा घणाघाती हल्ला केला होता. त्यानंतर याच टीकेला प्रत्यूत्तर म्हणून जयंत पाटील (Jayant Patil) यांनी वरील वक्तव्य केलं. ते सांगलीत बोलत होते. (Jayant Patil criticizes Ashish Shelar on Corona vaccine availability blames central government)
जयंत पाटील काय म्हणाले ?
“विरोधक त्यांचं काम करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे. लसीचा पुरवठा कमी होत आहे. याबाबत केंद्र सरकारने जबाबदारी घ्यायला हवी. सांगलीमध्ये लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि केंद्राकडून लस उपलब्ध करून द्यावी,” असे जयंत पाटील म्हणाले.
सांगलीमध्ये आणखी कडक निर्बध लावले जातील
तसेच पुढे बोलताना सांगलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होत असून हे गंभीर आहे. तिसरी लाट ही गंभीर आहे. याच कारणामुळे भविष्यकालीन परिस्थिती पाहता जिल्ह्यात काही मर्यादा वाढवण्यात येणार आहेत. गर्दी कमी करण्यासाठी उपायोजना करण्यात येणार आहेत. पुन्हा परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल असे तज्ज्ञांचे मत आहेत. त्यामुळे सांगलीमध्ये आणखी कडक निर्बध लावले जातील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं
तसेच पुढे बोलताना भविष्यात कडक निर्बंध लागू केल्यास येणाऱ्या संभाव्य अडचणींवरदेखील जयंत पाटील यांनी भाष्य केले. त्यांनी निर्बंध कडक केल्यानंतर सरकारने सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. याआधीच खूप काळापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण आगामी काळात व्यापारी आणखी साथ देतील अशी आशा व्यक्त करतो, असे जयंत पाटील म्हणाले.
आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर टीका
यापूर्वी आघाडी सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी करून टाकलं आहे. दुर्दैवाने येथे मृत्यूचा दर जास्त आहे. कोरोना रुग्णांना सुविधा देण्यात सरकार कमी पडत आहे. या सरकारकडून सकारात्मक प्रयत्न दिसला नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. तसेच पुढे बोलताना त्यांनी ठाकरे सरकारची वृत्ती ही रक्तपिपासू असल्याचा आरोप केला. लस आल्यावर देशात महाराष्ट्र एक नंबरवर आला ते ठाकरे सरकारमुळे आणि काही चुकले तर मोदी सरकार जबाबदार, अशी राज्य सरकारची दुटप्पी भूमिका आहे. ठाकरे सरकारची वृत्ती रक्तपिसासू अशी आहे, असे आशिष शेलार म्हणाले.
इतर बातम्या :
व्याजातून कमाई करायचीय तर आयकराचा हा नियम वाचा, मिळेल संपूर्ण माहिती
प्रियकराबरोबर लग्न लावून देण्याच्या नावाखाली प्रेयसीची साडेचार लाखांची फसवणूक
“शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”
(Jayant Patil criticizes Ashish Shelar on Corona vaccine availability blames central government)