NEET Success Story : शेतात काम केले, कोणताही क्लास लावला नाही अन् मिळवले नीटमध्ये यश
NEET Success Story : नीट परीक्षेचा निकाल लागला. या निकालात यश मिळवणाऱ्या अनेकांनी विपरीत परिस्थितीवर मात करत यशाचा पल्ला गाठला आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलीने कोणताही क्लास न लावता यश मिळवले आहे.
राजू गिरी, नांदेड : प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे…याची प्रचिती अनेक जण आपल्या यशाच्या माध्यमातून आणून देत असतात. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी मोठी स्वप्न पाहा अन् ती पूर्ण करण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून द्या, असे आपल्या भाषणांमधून वारंवार सांगितले. मग ही स्वप्न पाहून पूर्ण करण्याचा ध्यास देशातील तरुणांनी घेतला अन् तो पूर्ण केला. ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा नसताना, कोणताही क्लास नसताना एका अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलीने नीटच्या परीक्षेत यश मिळवले. विशेष म्हणजे हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले.
कोणी मिळवले यश
नांदेड जिल्हयातील कंधार तालक्यातील कंधारेवाडी या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी ज्योती डॉक्टर होणार आहे. विशेष म्हणजे तिने शेतात काम करुन नीटची तयारी केली. कुठलीही शिकवणी किंवा क्लान तिने लावला नाही. त्यानंतर पहिल्याच पहिल्याच प्रयत्नात ती नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिचे वडील अंकुश कंधारे शेतकरी आहे. त्यांची अडीच एकर जमीन आहे. त्यावरच कंधारे कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो.
परिस्थितीवर केली मात
कंधारे यांच्या घराची परिस्थिती हालाखीची आहे. त्यांची मुलगी ज्योती कंधारे अभ्यासात हुशार आहे. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच शाळेत झाले.
कुठून मिळाली प्रेरणा
ज्योती दहावीत असताना कोरोनामुळे लॉकडाऊन लागले होते. कोरोना महामारीत अनेक लोकांचे जीव वाचणारे डॉक्टर होते. ते पाहून आपल्याला देखील डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली, असे ज्योतीने सांगितले. यामुळे बारावी झाल्यानंतर तिने नीटची तयारी सुरू केली. परिस्थितीमुळे क्लास लावता येत नव्हते. मग गावात काही जणांनी नीटची परीक्षा दिली होती. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत ज्योतीने अभ्यास सुरू केला. युट्यूबवरील व्हिडिओपाहून देखील तिने अभ्यास केला. सकाळी शेतात जाऊन सहा तास काम, त्याचवेळी काही तास अभ्यास आणि घरी आल्यावर पाच ते सहा तास अभ्यास ती करत होती. या मेहनतीचे फळ तिला मिळाले. तिला नीटच्या परीक्षेत 720 पैकी 563 गुण मिळाले.
स्पप्न होणार पूर्ण
ज्योतीचे स्वतःचे आणि तिच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र त्यातही एक अडथळा आहे. सरकारी कोट्यातून नंबर लागला तरच ती डॉक्टर होऊ शकते. कारण खाजगी कॉलेजमध्ये शिकायची ज्योती कंधारे हिची आर्थिक परिस्थिती नाही. तिला भविष्यात स्त्रीरोग तज्ज्ञ व्ह्यायच आहे.