गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला तर किशोरी पेडणेकर… किरीट सोमय्या यांचे अत्यंत गंभीर आरोप
किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांनी खोटी कागदपत्रे दाखवून झोपडपट्टी पुर्वसन योजनेत (एसआरए) घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे
मुंबई : मागील काही दिवसांपासून शांत असलेले भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पुन्हा एकदा सोमय्या यांनी घोटाळ्याचे जुने आरोप बाहेर काढले आहेत. माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांच्यावर सोमय्या यांनी घोटाळ्याचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी अशी मागणीच त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यामुळे किशोरी पेडणेकर अडचणी वाढू शकतात.
किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांनी खोटी कागदपत्रे दाखवून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या सगळ्या घोटाळ्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फेत (ईओडब्ल्यू) चौकशी व्हावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमय्या यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या गृहमंत्रालयाने चौकशीला मान्यता दिल्यास पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सोमय्या यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या कथित घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. कंपनी मंत्रालय आणि माहिती अधिकारातंर्गत मिळालेली काही कागदपत्रे देखील सोमय्या यांनी या पत्रकार परिषदेत पुरावा म्हणून सादर केली.
पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील काही गाळे हडपल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
किशोरी पेडणेकर यांनी एसआरएचे गाळेही स्वत:च्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेट कंपनीच्या नावावर केल्याचा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या यांनी पडणेकर यांची कंपनी व गाळाधारक संजय अंधारी यांच्यादरम्यान झालेल्या कराराची प्रतही पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे या करारावर किशोरी पेडणेकर यांच्या भावाची सही आणि फोटो असल्याचा दावा या कागदपत्रांच्या आधारे सोमय्या यांनी केला आहे.
6 जुलै 2017 रोजी अंधारी यांनी ही जागा पेडणेकर यांच्या कंपनीला देण्यात आल्याचे करारात दाखवण्यात आले आहे. मात्र, करारातील अंधारी यांची सही पेडणेकरांचे एकेकाळचे भाऊ सुनील कदम यांची सही सारखीच आहे.
तसेच, करारामध्ये संजय अंधारी यांच्या जागी सुनील कदम यांचा फोटो लावण्यात आल्याचे सोमय्या म्हणाले. पेडणेकर आणि त्यांच्या परिवारावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी सोमय्यांनी फडणवीसांकडे केली आहे.