प्रत्येक वादळात खंबीरपणे उभ्या… सरपंच पद ते केंद्रीय मंत्री… कोण आहेत रक्षा खडसे?
Raksha Khadse Profile : रावेर खासदार रक्षा खडसे या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात सहभागी होत आहेत. आज रक्षा खडसे या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे मोठा संघर्ष रक्षा खडसे यांनी त्यांच्या आयुष्यात केलाय. रक्षा खडसे यांनी सरपंच पदापासून आपल्या राजकारणाची सुरूवात केलीये.
![प्रत्येक वादळात खंबीरपणे उभ्या... सरपंच पद ते केंद्रीय मंत्री... कोण आहेत रक्षा खडसे? प्रत्येक वादळात खंबीरपणे उभ्या... सरपंच पद ते केंद्रीय मंत्री... कोण आहेत रक्षा खडसे?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Raksha-Khadse.jpg?w=1280)
एनडीए (NDA) सरकारचा आज शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी हे आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच इतरही 40 ते 45 खासदार आजच मंत्रीपदाची शपथ घेतील. आज संध्याकाळी 7.30 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सरकारी स्थापन होणार आहे. या शपथविधी सोहळ्याकडे फक्त देशाच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. काही देशांचे प्रमुख या शपथविधीमध्ये सहभागी होणार आहेत. खानदेशच्या रावेरची सून आणि खासदार रक्षा खडसे या देखील आज केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
सासरे राष्ट्रवादीत रक्षा खडसे यांची भाजपावरच निष्ठा
थेट केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरीच रक्षा खडसे यांना लागली आहे. मुळात म्हणजे जळगावमध्ये राजकारणात खडसे कुटुंबियांचे वर्चस्व बघायला मिळते. गेल्याच वर्षी एकनाथ शिंदे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर रक्षा खडसे या देखील भाजपा सोडणार असल्याचे तूफान चर्चा रंगताना दिसली. मात्र, मी भाजपामध्येच राहणार असल्याचे रक्षा खडसे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. सासरे एकनाथ खडसे यांना पक्षामध्ये त्रास होत असल्याने ते पक्षाच्या बाहेर पडले आहेत. मला कोणत्याही प्रकारचा त्रास पक्षात होत नसल्याचे रक्षा खडसेकडून स्पष्ट करण्यात आले.
कोण आहेत रक्षा खडसे
2014 मध्ये पहिल्यांदा रक्षा खडसे या खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर दुसऱ्यांदा 2019 मध्ये खासदार म्हणूनही रक्षा खडसे निवडून आल्या. 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून रक्षा खडसे निवडून आल्या. आता थेट केंद्रीय मंत्री रक्षा खडसे होणार हे स्पष्ट झालंय. हेच नाही तर खडसे कुटुंबिय दिल्लीकडे रवाना देखील झाले आहेत. आता रक्षा खडसे यांना नेमकी कोणती जबाबदारी मिळते, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 मध्ये झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे याच्यासोबत रक्षा खडसेचे लग्न झाले.
प्रत्येक वादळात खंबीरपणे उभ्या
निखिल खडसेने आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसे राजकारणात उतरल्या. सर्वात विशेष बाब म्हणजे रक्षा खडसे यांनी पहिली निवडणूक ही कोथळी ग्रामपंचायतीची लढवली आणि सरपंच म्हणून राजकिय प्रवासाची सुरूवात केली. रक्षा खडसे या उच्च शिक्षित असून बी. एससीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. 2010 पासून भारतीय जनता पार्टीचे काम रक्षा खडसेने सुरू केले. जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूकही रक्षा खडसे यांनी लढवली आहे आणि त्यांनी अनेक पदांवर जिल्हा परिषदेमध्ये काम केले.
मतदार संघात रक्षा खडसे यांचा तगडा जनसंपर्क
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यादरम्यान रावेर मतदारसंघातून मनिष जैन यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. यावेळी दणदणीत विजय मिळवत मोठे यश रक्षा खडसे यांनी मिळवले. मतदार संघात रक्षा खडसे यांचा जनसंपर्क अत्यंत चांगला आहे. रक्षा खडसे यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक मोठे चढउतार बघितले आहेत. पतीच्या आत्महत्येनंतरही कुटुंब सांभाळत राजकारणात मोठे काम रक्षा खडसे यांनी केले आहे. प्रत्येक वादळात रक्षा खडसे या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या दिसल्या आहेत.