कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नात मोठी घट; देवस्थान समित्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची भीती
मंदिरे वेळेत सुरू न झाल्यास देवस्थान समित्यांची आर्थिक घडी विस्कटेल अशी देखील भीती व्यक्त होत आहे. |Temples in Maharshtra
कोल्हापूर: ऐन नवरात्रोत्सव काळात कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने त्याचा मोठा फटका देवस्थान समितीच्या उत्पन्नाला बसला आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात देश-विदेशातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या माध्यमातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पाच ते सात कोटी रुपयांचे दान देवीच्या पदरात नऊ दिवसात टाकला जाते. यावर्षी मात्र मंदिर बंद असल्याने या उत्पन्नात घट झाली असून ऑनलाईन देणगी स्वरूपात एक कोटी 12 लाख रुपये देवस्थान समितीकडे जमा झाले आहेत. (Temple income and donations take a hit due to coronavirus restrictions)
वर्षभराचा विचार केल्यास अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरातून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला 20 कोटी रुपयापर्यंतच दान येते. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने यातही लक्षणीय घट झाली आहे. मंदिरांचे उत्पन्न घटले असले तरी देवस्थान समितीचा खर्च जैसे थे आहे. त्यामुळे मंदिरे वेळेत सुरू न झाल्यास देवस्थान समित्यांची आर्थिक घडी विस्कटेल अशी देखील भीती व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, जिम आणि इतर दैनंदिन व्यवहार टप्याटप्प्याने सुरु करण्यात आले. मात्र, सरकारने अजूनही मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाही. यावरून मध्यंतरी भाजप पक्ष आक्रमकही झाला होता. सरकार मदिरालय सुरु करते, पण मंदिर नाही, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. परंतु, मंदिरे सुरु झाल्यास त्याठिकाणी मोठयाप्रमाणात गर्दी होऊ शकते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने सरकारने अद्याप मंदिरे खुली करण्यास परवानगी दिलेली नाही.
मंदिराच्या मुद्द्यावरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्री संघर्ष राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रावरुन जोरदार राजकारण रंगलेलं संपूर्ण राज्यानं पाहिलं आहे. त्या पत्रात राज्यापालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन देण्यासाठी काही प्रश्न विचारे होते. ‘राज्यात बार-रेस्टॉरंट सुरु झाले, मग देव कुलुपबंद का? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का?’ अशाप्रकारच्या पश्नांचा त्यात समावेश होता. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते कुणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
संबंधित बातम्या:
Maharashtra | मंदिर हा आस्थेचा विषय, मंदिरे राजकारणाचा विषय होऊ शकत नाही: आचार्य तुषार भोसले
मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घाईघाईत घेणार नाही; मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा मंत्र!
(Temple income and donations take a hit due to coronavirus restrictions)