Gokul| चेअरमनसाहेब, डोळ्यात डोळे घालून बोला, कोल्हापुरात शौमिका महाडिकांचं आवाहन, गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गदारोळ
वार्षिक अहवाल सादर करणाऱ्या अध्यक्षांनी एक तरी वाक्य दूध उत्पादकांच्या नजरेला नजर भिडवून बोलावं, असं आवाहन शौमिका महाडिक यांनी केलं.
कोल्हापूरः माझा दूध उत्पादक खूप साधा आहे. त्याला गुंडाळण्याचा प्रयत्न करू नका. चेअरमन साहेब मान्य करा, तुम्हाला उत्तरं देता येत नाही. एकदा तरी नजर वर करून पहा, असं आव्हान कोल्हापुरात शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) यांनी दिलं. कोल्हापूरमध्ये आज गोकुळ दूध (Gokul Milk) संघाच्या 60 व्या वार्षिक सभेत जोरदार गोंधळ झाला. सभा सुरु होण्यापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. सदस्यांना बसण्यासाठी जागाच नसल्याचा आरोप शौमिका महाडिक यांनी केला. कार्यकर्त्यांना घेऊन त्या सभेतून बाहेर पडल्या आणि त्याच आवारात त्यांनी समांतर सभा सुरु केली. एकिकडे दूध उत्पाद संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील (Vishwas Patil) यांचे भाषण सुरु होते तर दुसरीकडे माध्यम प्रतिनिधी आणि स्वतःचा माईक घेऊन शौमिका महाजन यांचे आरोप सुरु होते. वार्षिक अहवाल सादर करणाऱ्या अध्यक्षांनी एक तरी वाक्य दूध उत्पादकांच्या नजरेला नजर भिडवून बोलावं, असं आवाहन शौमिका महाडिक यांनी केलं.
सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गदारोळ
गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. कालपासूनच या सभेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केली होती. त्यावरून सभेत काहीतरी गोंधळ होणार, याची चिन्हे दिसत होती. आज सभा सुरु होताच बसण्यासाठी जागा नसल्याचा आरोप करत शौमिका महाडिक यांनी वॉक आउट केला. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मुख्य भाषणाला सुरुवात केली. त्यात विरोधकांनी व्यत्य आणला. जोरदार घोषणाबाजी केली. त्याला सत्ताधारी गटानेही प्रत्युत्तर दिलं.
शौमिका महाडिकांचे आरोप काय?
बोर्डाच्या सदस्या शौमिका महाडिकांनी समांतर सभेत अध्यक्षांना उद्देशून जोरदार आरोप केले. त्या म्हणाल्या, ‘ आबाजी जरा बिन वाचता तरी बोला. उत्पादकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला. इथं तरी वाचून नका दाखवू. प्रत्येक गोष्ट यांना वाचून बोलावी लागते. जिल्ह्याचं उत्पादन किती वाढलं आधी सांगा… मोठे आकडे नंतर सांगा… माझ्या डोक्यात कल्पना आली आहे. जे हुर्रे करत आहेत, त्यांना उत्पादकाच्या जिव्हाळ्याचा एक प्रश्न विचारा. त्यांनी उत्पादकांच्या कामाचं काही बोलले तर मी मान्य करेन. आमचं एवढंच म्हणणं आहे, चांगलं काम केलं असेल तर उत्पादकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला..
महाडिक गटाची ताकद वाढणार?
कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ हे आर्थिक सत्तेचं केंद्र अनेक वर्ष महादेवराव महाडिक यांच्याकडे होतं. याच जोरावर महाडिक यांनी जिल्ह्यात दबदबा निर्माण केला होता. मात्र सतेज पटील आणि हसन मुश्रीफांनी गेल्या वर्षी महाडिकांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. त्यानंतर या दोघांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली. त्यातच आता महाडिक यांना खासदारकी मिळाल्याने या गटाचे वर्चस्व पुन्हा वाढू लागले आहे. आतापर्यंत झालेल्या अन्यायाचा बदला घेतला जाईल, असं वक्तव्य कालच महाडिक यांनी केलं होतं. त्यानुसार आज सर्वसाधारण सभेत महाडिक गटाने सत्ताधारी गटाला धारेवर धरल्याचं चित्र पहायला मिळालं.